धाराशिव – समय सारथी
अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स छत्रपती संभाजीनगर कृती विभागाने गांजा लागवड करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 146 किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई उमरगा तालुक्यातील मौजे धाकटेवाडी शिवारात करण्यात आली.
अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, धाकटेवाडी येथील शेतजमिनीत मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गांजा वनस्पतीची अवैधरित्या लागवड करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे 16 फेब्रुवारी रोजी शेत गट क्रमांक 38/163/2 येथे छापा टाकण्यात आला.nछापा कारवाईदरम्यान संबंधित शेतजमिनीवर गांजाची अवैध लागवड करून त्याची देखभाल व रखवाली केली जात असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी पोलीस ठाणे उमरगा येथे अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपाली पाटील यांच्या फिर्यादीवरून एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत कलम 8(क), 20(अ) व 11(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गांजा लागवडीसाठी वापरण्यात आलेले क्षेत्र धाकटेवाडी शिवारातील भोगवटाधारकांच्या शेतगटात असून लागवड करणारा इसम अद्याप अज्ञात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत, पोलीस अधीक्षक श्री अजीत टिके व वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डिवायएसपी साईनाथ ठोबरे, पोलीस निरीक्षक गीता बागवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपाली पाटील, सपोउपनि वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, हवालदार शैला टेळे, सुरेश राऊत, नागेश केंद्रे, निलेश सरपाळे, कैलास गाडंकर, नितीन जाधव, रविंद्रं साळवे, सुरज जोनवाल, ज्ञानेश्वरं चव्हाण, हरीशचंद्र मुंढे, अमितसिंग ठाकूर, अतुल तुपे, अम्रपाली सुर्यवंशी, ज्योती किर्तीकर, प्रियंका पवार यांनी केली आहे.
युवा वर्ग नशेच्या आहारी जाऊ नये यासाठी गांजा, ड्रग्ज व इतर अमली पदार्थांची लागवड, साठवण व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू असून नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सतर्फे करण्यात आले आहे.











