गर्भलिंग तपासणी रॅकेटचा भांडाफोड – तपासणीला 50 हजार, धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई
धाराशिव – समय सारथी
धाराशिव पोलिसांनी उमरगा येथे मोठी कारवाई करीत अवैध गर्भलिंग तपासणी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर सापळा रचत या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईनंतर आरोग्य विभाग तक्रार देत असुन पुढील प्रक्रिया सुरु आहे. डॉ दत्तात्रय खुने यांच्यासह आरोग्य विभागाचे पथक कारवाईत सहभागी होते.
पोलिसांनी गर्भलिंग तपासणी करणाऱ्या रॅकेटमधील एका दलाला काही गर्भवती महिलांना तपासणीसाठी कर्नाटक राज्यात घेऊन जाताना रंगेहात पकडले आहे. गर्भलिंग तपासणीसाठी हा दलाल प्रत्येक महिलेकडून 50 हजार रुपये घेऊन मुलगा की मुलगी याचे निदान करीत होता. यावेळी सुद्धा अवैध गर्भलिंग तपासणीचे कर्नाटक कनेक्शन उघड झाले असुन पोलीस यांचा तपास करीत आहेत.
मुलगा मुलगी हा भेद करणे चुकीचे असुन गर्भलिंग तपासणी हा कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे नागरिकांनी असे प्रकार कुठे सुरु असल्यास त्याची गोपनीय माहिती आरोग्य व पोलीस विभागाला द्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी केले आहे.