गर्दी आता दारूसाठी .. कोरोनाची रिस्क घेऊन नियमांचे उल्लंघन
उस्मानाबाद – समय सारथी
एकीकडे कोरोनाने कहर केलेला असताना रुग्णालयात व औषधी दुकानात रुग्णाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असताना आता उस्मानाबाद जिल्ह्यात लॉक डाउनच्या भीतीने मद्यप्रेमींची दारूसाठी झुंबड उडाली असून खरेदीसाठी नागरिकांच्या रांगांच्या रांगा लागल्या आहेत , दुकानासमोर गर्दी झाल्याने जमावबंदी आदेशासह कोरोना नियमांचे उल्लंघन होते आहे. अनेक जण गर्दीत कोरोनाची होण्याची शक्यता असतानाही रिस्क घेऊन दुकानासमोर गर्दी करीत आहेत.गर्दी कशासाठी दारूसाठी … रुग्णालयात एकीकडे अनेक जण जगण्याची धडपड करीत आहेत त्यासाठी डॉक्टर , नातेवाईक जीवाचे रान करीत आहेत तर दुसरीकडे दारू दुकानात झिंग होण्यासाठी मद्यप्रेमींची दारू साठा करण्यासाठी धावपळ होत आहे हे विरोधाभास असलेले चित्र कोरोना संकटात पाहायला मिळत आहे. दारू इतकी जीवनावश्यक बाब आहे का ? हा प्रश्नही या संकटात समोर आला आहे.
उस्मानाबाद शहरातील अरुण व राजा वाईन शॉपच्या समोर सकाळ पासून मद्यप्रेमीची मोठी गर्दी होती, इथे कोरोना नियमांचे उल्लंघन होत असताना प्रशासनाच्या कोणत्याही यंत्रणेने किंवा नेमून दिलेल्या पथकाने यावर कारवाई करण्याची तसदी घेतली नाही. या रांगेत काही महिलांचाही समावेश होता तर अनेक जण बॉक्सच्या बॉक्स खरेदी करून पिण्यासाठी व विक्रीसाठी साठा करीत होते. लॉकडाउन काळात हा मद्यसाठा नेहमी प्रमाणे चढ्या दराने विकला जातो.