गरजू रुग्णांना मिळणार जिल्हा शासकीय रुग्णालयातून रेमडीसीवीर इंजेक्शन
खासगी रुग्णालय महात्मा फुले योजनेत असल्यास मिळणार इंजेक्शन मोफत
रुग्णालय फुले योजनेत नसल्यास ३ दिवसासाठी मिळणार उसनवारीने इंजेक्शन
उस्मानाबाद – समय सारथी
कोरोना संसर्गात उपचारासाठी महत्वाचे मानल्या जाणाऱ्या रेमडीसेविर इंजेक्शनसह अन्य औषधांच्या वापराबाबत व ती तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी महत्वपुर्ण आदेश जारी केले आहेत. सद्यस्थितीत रेमडीसीवीर या औषधांचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातील रेमडीसीवीरचा पुरवठा खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना गरज आहे का ? ते पडताळून करण्यात येणार आहे. रुग्ण उपचार घेत असलेले रुग्णालय महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत येत असल्यास जिल्हा रुग्णालयातून मोफत इंजेक्शन देण्यात येईल तर खासगी रुग्णलाय त्या योजनेत येत नसल्यास जिल्हा रुग्णालयातून उसनवारी तत्वावर ३ दिवसासाठी देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या या आदेशाने गरजू रुग्णांना बराचसा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर या इंजेक्शनच्या वापराचे ऑडिट करण्याचेही आदेश दिले आहेत.
सद्य स्थितीत संपूर्ण जगात कोरोनाच्या महामारीने ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राज्यात व उस्मानाबाद जिल्ह्यात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. कोरोनाच्या उपचारामध्ये मध्यम व तीव्र संसर्ग झालेल्या रुग्णांना नवीन विषाणूरोधक औषधे वापरण्याबाबत शासनाने २२ जुलै २०२० रोजीच्या प्रमाणित उपचार पध्दतीमध्ये इंजेक्शन रेमडेसीवीर टॉसिलीझूमॅब व फविपिरावीर गोळ्यांचा समावेश केलेला आहे. सद्यस्थितीत या औषधांचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने जिल्ह्यासाठी उपलब्ध असलेल्या किंवा खरेदीद्वारे प्राप्त झालेला वरील इंजेक्शन, गोळ्यांचा साठ्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक व योग्य रुग्णांसाठी झाला पाहिजे, या दृष्टीने राबवायची संचालन प्रक्रिया जाहीर केली आहे.
प्रथम या औषधी इंजेक्शनचा साठा जिल्हा रुग्णालय औषध भांडारात पुरेसा असल्याबाबत खात्री करुन घ्यावी. कोविड बाधित रुग्ण ज्या रुग्णालयात आहे व त्यास औषध-इंजेक्शन देण्याची गरज, पात्रता असल्याची खात्री आहे. त्या रुग्णालयाच्या प्रमुखांनी उपचार देणार्या भिषकाने, जिल्हा रुग्णालयातील डॉ. मुल्ला फिजिशियन यांच्याशी संपर्क साधून रुग्णांची स्थिती व अहवाल कळवावा. डॉ. मुल्ला उपलब्ध ड्युटीवरील फिजिशियन यांनी इतर रुग्णालयातील कोविड बाधित रुग्णासंबंधी सर्व उपयुक्त माहितीची पडताळणी करुन, इंजेक्शन, औषध देण्यास रुग्ण योग्य आहे, अशी शिफारस मागणीपत्रावर नोंदवावी रुग्ण जर महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजना (एमपीजेएवाय) अंगीकृत रुग्णालयात भरती असेल तर वरील औषधी इंजेक्शन मोफत दिली जातील. त्या रुग्णालयांनी त्याबाबत रुग्णाकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारु नये. जर रुग्ण खाजगी रुग्णालयात भरती असेल तर रुग्णालयाने उसनवारी तत्वावर इंजेक्शन, औषधींची मागणी करावी. संबंधित रुग्णालयाने शासनाद्वारे निश्चित दराप्रमाणेच रुग्णाकडून शुल्क घ्यावे व 3 दिवसांत इंजेक्शन, औषधे घेतलेल्या संख्येइतकीच परत देणे आवश्यक राहिल. सर्व रुग्णालयांनी या औषधे इंजेक्शनचा केलेला वापर, संख्या इत्यादी माहिती विहित नमुन्यात जिल्हा रुग्णालयास 7 दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. विना वापर, राहिलेला औषधसाठा तत्काळ जिल्हा रुग्णालयास परत करणे आवश्यक आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उक्त नमुद औषधे उपलब्ध असलेल्या औषधी दुकानांची यादी प्रसिद्ध केली आहे. कोणत्याही औषधी दुकानदाराने सरकारी, खाजगी रुग्णालयाचे लेखी प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय रेमडेसिवीर औषधाची विक्री करु नये. रेमडेसिवीर औषध विकत घेतलेल्या व्यक्तीचे नाव, रुग्णाचे नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक याची दररोज नोंद ठेवून सहाय्यक आयुक्त औषध प्रशासन यांना सादर करावी. शासनाद्वारे सर्व औषधे, इंजेक्शन यांचा दर निश्चित असून रेमडीसीवीर १०० एमजीसाठी ६६५.८४ रुपये तर फविपिरावीर २०० एमजी/ ३४ गोळी प्रति गोळी ६.७२ पैसे या प्रमाणे आहे. औषधी दुकानदारांनी त्यांचेकडे विक्रीसाठी उपलब्ध रेमडेसिविरची संख्या दैनंदिन स्वरुपात सहाय्यक आयुक्त औषध प्रशासन यांना सादर करावी. खाजगी रुग्णालयांनी नवीन कोविड-19 उपचार प्रोटोकॉल प्रमाणेच रेमडेसिविर इंजेक्शन रग्णांना द्यावे, अनावश्यक वापर टाळावा असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.