धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात सध्या जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून भाजप शिवसेना महायुतीत ‘गद्दारी’ व ‘विश्वासघात’ या शब्दावरून चांगलेच रणकंद सुरु आहे. गद्दार कोण व त्याची परिभाषा काय यावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत, त्यातच माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेतील एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. ‘भाजप गद्दार त्यांना धडा शिकवा’ असे आवाहन त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे समोर केले होते, भाजपला जाहीर सभेत ‘गद्दार’ म्हणणे हे भाजपच्या शीर्ष नेतृत्व व कार्यकर्ते यांना चांगलेच ‘जिव्हारी’ लागले आहे. अध्यक्षपदाचा दावा करणाऱ्या गायकवाड यांना नेमके हेच वक्तव्य अडचणीचे ठरत असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी अध्यक्ष पदावर आपला दावा केला असुन सदस्य नजरकैदेत ठेवण्यासह जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना पक्षात उघड उघड 2 गट असुन गायकवाड-चौगुले हा एक गट भाजप सोबत तर सावंत गट स्वतंत्र आहे. गायकवाड चौगुले यांनी भाजप सोबत युती करीत निवडणूक लढवली तर सावंत यांच्या भुम परंडा वाशी मतदार संघात भाजप सेना आमने सामने होते. शिवसेनेचे निवडून आलेले 2 सदस्य भाजपच्या गोटात शामिल झाले आहेत.
आमदार प्रा तानाजीराव सावंत यांनी महायुतीचा ‘विश्वासघात’ केल्याचा आरोप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या ई-मेलवरून पाठवलेल्या प्रसिद्धी पत्रकात केला. भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांच्या नावाने हे आरोप करण्यात आले आहेत. सावंत यांनी महायुतीशी विसंगत भुमिका घेत शिवसेना उबाठा व काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी केली. निवडून आलेले 8 सदस्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नेण्याऐवजी त्यांनी ते स्वतःच्या ताब्यात ठेवले. ही बाब अत्यंत गंभीर आणि संशयास्पद आहे. पक्षांतर्गत शिस्तीचा भंग करणारी असल्याचे म्हणत सावंत यांना एकप्रकारे पक्ष शिस्त शिकवली व कडक कारवाई करावी अशी मागणी केली.
उमरगा लोहारा येथे महायुती असतानाही माकणी येथे भाजपने उमेदवार दिला आहे, त्यांनी गद्दारी केली आहे त्यांना धडा शिकवलाच पाहिजे असे आवाहन माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी केले होते. तिथे नातेवाईक, कार्यकर्ते यांची भेट घेऊन जास्तीत जास्त मते गोळा करा व भाजपला पराभूत करा असे जाहीर आवाहन गायकवाड यांनी केले. गायकवाड यांचे हेच वक्तव्य भाजपला ‘जिव्हारी’ लागले आहे.
एकीकडे सावंत जवळ येत नाहीत तर दुसरीकडे गायकवाड जाहीर भाषणात भाजपला ‘गद्दार’ म्हणतात अशी स्तिथी आहे. भाजपकडुन अध्यक्ष पदासाठी ‘माऊली’ म्हणुन अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांचे नाव पुढे केले जात असुन शिवसेनेकडुन ‘मातोश्री’ म्हणुन उषा ताई रवींद्र गायकवाड यांचे नाव पुढे केले जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट भाजप सोबत आहे.











