खेळाडूंची लुट, नोंदणी रद्द तरी कारभार सुरूच – उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्ष व सचिवावर कारवाईची मागणी
धाराशिव – समय सारथी
बोगस जिल्हा क्रिकेट असोसिएशन स्थापन करुन खेळाडूंची फसवणूक व नुकसान करणाऱ्या अध्यक्ष विजय दंडनाईक व सचिव दत्ता बंडगर यांच्यासह इतरांवर कारवाई करावी, अशी मागणी धाराशिव येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे प्रमोद शिवाजीराव देशमुख यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशन या संघटनेची नोंदणी 1 जानेवारी 2018 रोजी धर्मादाय आयुक्त यांनी सुनावणी अंती रद्द केली आहे तरी देखील या संघटनेच्या नावाचा दुरुपयोग करुन बेकायदेशीर रित्या कामकाज व खेळाडू यांच्याकडुन विविध स्पर्धाच्या नावाने आर्थिक लूट केल्याचा आरोप होत आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, क्रिकेट या खेळाशी काही संबंध नसणाऱ्या विजय दंडनाईक, दत्ता बंडगर व इतरांनी एकत्र येऊन उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशन संघटना स्थापन करुन खेळाचा व खेळांडूचा पुर्णपणे सत्यानाश करीत आहेत. तक्रारदार प्रमोद देशमुख यांचा मुलगा कपिल देशमुख हा १६ वर्ष संघात खेळत आहे त्याच्याकडुन पैसे घेतल्याचा आरोप आहे.
जिल्हा क्रिकेट संघटनेवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांनी गेली अनेक वर्षे बंदी घातलेली आहे असे देशमुख यांना माहिती मिळालेली आहे त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी अध्यक्ष विजय दंडनाईक, सचिव दत्ता बंडगर व इतर लोकांविरुध्द योग्य ती कायदेशीर कार्यवाही करुन त्यांना क्रिकेट स्पर्धा मॅचेस घेण्यासाठी बंदी घालावी. यावर धर्मादाय आयुक्त काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.