खुल्या जागेवर भुखंड घोटाळ्याची तक्रार – गुंठेवारी व बांधकाम परवाना नियमबाह्य, जिल्हाधिकारी यांनी मागवला अहवाल
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषद हद्दीतील सर्व्हे क्रमांक 129 मध्ये मंजुर रेखाकनात नगर परिषद मुख्याधिकारी, सहायक निबंधक, गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी व एका खासगी व्यक्तीने संगनमत करुन खरेदीखत, गुंठेवारी व नियमबाह्य बांधकाम परवाना दिल्याची तक्रार राहुल विक्रम बागल यांनी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे कागदपत्रासह दिली आहे. मंजुर रेखाकनातील खुल्या जागेवर (ओपन स्पेस) अनेक बाबी नियमबाह्य केल्याचा आरोप केला आहे. जिल्हाधिकारी यांनी याबाबतचा खुलासा मुख्याधिकारी यांच्याकडून मागविला आहे.
प्रसाद कृषी गृहनिर्माण संस्थेने सर्व्हे नंबर 129 मध्ये 3 एकर 6 गुंठे इतक्या क्षेत्रावर 2 फेब्रुवारी 1980 रोजी लेआउट केले त्याला 13 फेब्रुवारी 1981 रोजी रेखाकनास अंतीम मंजुरी मिळाली. गृहनिर्माण संस्थेच्या तत्कालीन चेअरमन व सेक्रेटरी यांनी सगनमत करुन रेखाकनात असलेली खुली जागा प्लॉट असल्याचे दाखवून अधिकारी यांच्याशी संगनमत करुन अब्दुल गणीशहा महमद यांना विक्री केली ती जागा गुणवंत वाघमोडे यांना पुन्हा विक्री केली.
वाघमोडे यांनी मुख्याधिकारी वसुधा फड यांच्याशी संगनमत करुन रेखाकनामधील नगर परिषदेची खुली जागा स्वतःच्या नावे दाखवून नामांतर करुन घेतले व त्या जागेची फड यांनी चुकीच्या पद्धतीने गुंठेवारी आणि बांधकाम परवाना दिल्याचा आरोप बागल यांनी तक्रारीत केला आहे. याबाबतची कागदपत्रे दिली जात नसून अरेरावीची भाषा वापरली जाते.या प्रकरणात दोषीवर गुन्हा नोंद करुन कागदपत्रांच्या संचिका ताब्यात घ्याव्यात व कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी या प्रकरणात मुख्याधिकारी फड यांचा खुलासा मागवावा असे आदेश नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी सतीश शिवणे यांना दिले आहेत. यात नगर परिषद, सहकार, भूमी अभिलेख यासह अन्य विभागाचा संबंध आहे त्यामुळे खुल्या जागेच्या या कथित भुखंड घोटाळा प्रकरणात काय सत्य येते हे खुलासानंतर समोर येणार आहे व त्यानंतर कारवाईचे स्वरूप ठरणार आहे.