खिंडार – उस्मानाबादेत काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या या नेत्यांचा आज शिवसेनेत होणार प्रवेश
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादी व भाजपला मोठे खिंडार पडले असून माजी उपाध्यक्ष, नगरसेवक आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे शिवबंधन बांधून प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांच्या पुढाकारातून हे पक्ष प्रवेश होत असून यामुळे शिवसेना संघटनेला बळ मिळणार आहे.
लोहारा येथील काँग्रेसचे नेते तथा माजी उपाध्यक्ष दीपक जवळगे यांच्यासह उमरगा लोहारा तालुक्यातील अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करतील. आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार रवींद्र गायकवाड हे शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून निघण्यास यामुळे मदत होणार आहे.
उस्मानाबाद शहरातील नगरसेवक प्रदीप उर्फ पिंटू घोणे, गणेश बाप्पा खोचरे यांच्यासह भाजपचे नाना घाडगे शिवसेनेत प्रवेश करतील तर उस्मानाबाद पंचायत समितीचे माजी उप सभापती शाम जाधव हे देखील आज प्रवेश करणार आहेत. यामुळे शहर,तालुक्यासह जिल्ह्यात शिवसेना मजबूत होणार आहे.