खडाजंगी – खासदार ओमराजे व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यात पुन्हा वाकयुद्ध
भंगारचोर, औकात, तेरणेचा चोर, बाळ – नियोजन समितीची बैठक ठरली आखाडा
धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकरं व भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यात हमरातुमरी होत जोरदार खडाजंगी झाली. तेरणा येथील प्रकल्पच्या बंद पाईपलाईन मुद्यावरून हा शाब्दिक वाद पेटला नंतर त्याचे वाकयुद्धात रूपांतर झाले अखेर पालकमंत्री डॉ सावंत व आमदार चौगुले यांच्या मध्यस्थीनंतर यावर तात्पुरता पडदा पडला. भंगारचोर, औकातीत रहा, बाळ आहेस अजून तु यासह तेरणा ट्रस्टचा लुटारू, पिता पुत्र चोर अश्या शब्दाने दोन्ही नेत्यांनी एकमेकांचा उद्धार केला. यापूर्वी देखील खासदार ओमराजे व आमदार राणा यांच्यात एकेरीवर वाद झाला होता. पाटील व राजेनिंबाळकर या दोघांतील राजकीय वाद सर्वश्रुत आहे.
राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृह येथे समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार सुरेश धस, आमदार कैलास पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार राणाजगजितसिह पाटील, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी , जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजना 2022-23 मार्च अखेरच्या 374 कोटी 48 लाख खर्चास सभागृहाने मान्यता दिली.
कळंब तालुक्यातील घारगाव येथील जलजीवन मिशन योजनेचे काम रखडले होते हा मुद्दा आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला. त्यावेळी अधिकारी यांनी तांत्रिक कारणाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार काम बंद असल्याचे सांगितले. त्यामुळे ओमराजे यांनी संबंधित अधिकारी यांना जाब विचारला असता आमदार राणा पाटील यांनी हस्तक्षेप करीत हळू बोला हळू बोला असा सल्ला ओमराजे यांना दिला त्यावर ओमराजे भडकले मी तुला बोललो नाही, तु मध्ये तोंड घालू नकोस त्यानंतर वाद मिटला मात्र नंतर काही वेळाने तो पेटला.
तेरणा येथील प्रकल्पच्या बंद पाईप लाईनचा मुद्दा समोर आल्यावर पुन्हा एकदा खासदार – आमदार यांच्यात वाद सुरु झाला. 40 कोटी रुपये खर्च करुन बागायती जामीन जिरायत असल्याचे हे भारतातील एकमेव उदाहरणं असल्याचे खासदार ओमराजे यांनी सांगितले. या भागातील शेतकरी यांना एकदाही पाणी मिळाले नाही हा अन्याय आहे. त्यानंतर या मुद्यावर चर्चा सुरु असताना वाद हळू हळू पेटला.
आमदार राणा यांनी खासदार ओमराजे यांना भंगारचोर म्हणून हिनविले त्यावर ओमराजे यांनी तु तुझा बाप जिल्ह्याचा चोर, तुम्ही तेरणा कारखान्याची वाट लावली. 427 कोटी रुपयांचे कर्ज करुन माझ्या हातात सप्रेम भेट दिली, इतकी कर्तबगारी आहे तुमची. मंत्री सावंत साक्षीदार आहेत, मी सोलापूर बँकेतून 13 कोटी भरले. त्यानंतर आमदार राणा यांनी ओमराजे यांना अजून तु बाळ आहेस बाळ, नीट बोल, औकातीत रहा असे म्हणाले त्यानंतर वाद चिघळला
मात्र पालकमंत्री डॉ सावंत व आमदार चौगुले यांनी दोघांना शांत रहा असे सांगितले त्यामुळे वाद मिटला.