– उस्मानाबाद नगर परिषद ठेकेदार यांनी केलेल्या बॅरीगेटींगचे गुणवत्ता पूर्ण कामाचा नमुना –
कोरोना काळात कंटेनमेंट झोन प्रकरण – बोगस बिले सादर करुन लाखो रुपये लाटल्याची तक्रार
कागदोपत्री ताळमेळ, उस्मानाबाद शहरात 80 लाखांचे बॅरीगेटींग ?
उस्मानाबाद – समय सारथी
कोरोना या जागतिक संकटाच्या काळात उस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीने ठेकेदार मार्फत कंटेनमेंट झोन करण्यात आले होते. हे कंटेनमेंट झोन केल्यानंतर अनेक ठिकाणी झोन केल्याची बोगस बिले सादर करुन लाखो रुपये लाटल्याची तक्रार करण्यात आली होती मात्र या प्रकरणाची चौकशी लाल फितीच्या कारभारात अडकली असून हे प्रकरण दपडले गेल्याची चर्चा आहे. उस्मानाबाद शहरात तब्बल 80 ते 90 लाख रुपयाचे बाबू व पत्रे शहरात लावल्याचे दाखविले असून या लाखोच्या बिलाने नगर परिषद व सरकारला चुना लागणार आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या त्यानुसार उस्मानाबाद शहरात कंटेनमेंट झोन तयार करुन त्यास बॅरीगेटिंग करण्यासाठी ठेकेदार मार्फत काम करण्यात आले होते. या कामासाठी जुलै 2020 मध्ये 20 लाख व ऑगस्ट 2020 मध्ये नगर परिषद फंडातून 5 लाख ठेकेदार याला अदा करण्यात आले आहेत. या कामाचे हे पैसे दिलेले असताना ठेकेदार याने 50 लाख रुपये देण्याची मागणी नगर परिषद मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
या कामात बॅरीगेटिंग न करता बोगस बिले सादर करुन ठेकेदार संस्थेने देयके नगर परिषदेकडून उचलली आहेत. यामध्ये शासनाच्या निधीचा अपहार करणाऱ्यात आला आहे याची सखोल चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी व तोपर्यंत बिले अदा न करण्याची मागणी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अभय इंगळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ऍड नितीन भोसले व शहराध्यक्ष राहुल काकडे यांनी केली होती.
या प्रकरणात बिले काढण्यासाठी खास बाब म्हणून निधी मागणी करुन बिले अदा करण्यात अनेक अधिकारी गुंतले आहेत. हे प्रकरण सध्या लालफितीच्या कारभारात अडकले आहे. या प्रकरणात कारवाईसाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
इतक्या मोठ्या रकमेतून उस्मानाबाद नगर परिषदेला कायम स्वरूपी यंत्रणा खरेदी करता आली असती मात्र कोरोना संकटात सुद्धा ठेकेदार यांना पोसने ही परंपरा नगर परिषदेने जोपासली. बिले सादर केलेल्या संचिकेची तपासणी करणे गरजेचे आहे. कंटेनमेंट झोन करणाऱ्याचे आदेश व सादर केलेली बिले यात मोठी ताफावत असून कागदोपत्री ताळमेळ घातला गेल्याची चर्चा आहे.
उस्मानाबाद शहरात कोरोना काळात सॅनिटायझर फवारणी प्रकरणात हाच कित्ता आहे. मढ्याच्या टाळूवरील लोणी खाल्याचा हा प्रकार निंदनीय आहे.