कोरोना उपाययोजना – 68 गावांच्या सीमा बंद तर 173 गावात कडक निर्बंध
माझे कुटुंब,माझी जबाबदारी मोहीम सुरू, काळजी घ्या – जिल्हाधिकारी
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील 173 गावात 5 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडल्याने कंटेन्मेंट प्लॅनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहेत तर जिल्ह्यातील 68 गावांमध्ये 10 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडल्याने या 68 गावांच्या सीमा बंद करून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कलम 144 लागू केले आहे.शहरासह ग्रामीण भागात माझे कुटुंब , माझी जबाबदारी ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने १ मे २०२१ च्या सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत त्यामुळे नागरीकांनी केवळ अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडणे अपेक्षित आहे .जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असली तरीही नागरीक अत्यावश्यक सेवांबरोबर सुट देण्यात आलेल्या बाबींचे कारण नमुद करुन मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असून संचारबंदीचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत आहेत .
सद्यस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्यातील १७३ गावांमध्ये ५ पेक्षा जास्त कोविड बाधीत रुग्ण आढळले आहेत . त्यामुळे सर्व उपविभागीय दंडाधिकारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे हद्दीत ज्या गावांमध्ये १० पेक्षा जास्त कोविड बाधीत रुग्ण आढळले आहेत अशा ६८ गावांतील सिमा बंद करुन फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार त्या भागात जाण्यास मनाई केली आहे व सदर ठिकाणी जनता कर्फ्यु लागू केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील १७३ गावांमध्ये कंटेन्मेंट प्लॅनची कडक अंमलबजावणी करण्यात येत असून , त्या गावांमध्ये ” माझे कुटुंब माझी जबाबदारी ” ही मोहीम प्राधान्याने राबविण्यात येत आहे . या गावांशी संलग्न असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र , ग्रामीण रुग्णालय , उपजिल्हा रुग्णालयांनी सतर्क राहणे बाबत कळविले आहे. सदरील गावातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांनी कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास तात्काळ जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र , ग्रामीण रुग्णालयात जाऊन तपासणी करावी व आजार अंगावर काढू नये असे आवाहान जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.