कोरोनाचा बाजार ? इथे होतेय कोरोनाची देवाण-घेवाण
दवाखाने , बाजारपेठ , दुकाने ठरत आहेत कोरोना वाटप केंद्र ?
ब्रेक द चेन की लिंक द चेन – लहान मुले, ज्येष्ठ नागरिक विना मास्क
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना संकट कायम असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे व मृत्यूचे आकडे वाढत आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना दुकाने बंद ठेवण्याचे व संचारबंदीचे आदेश असतानाही त्यांचे पालन केले जात नाही त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. भाजीपाला , किराणा दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने हा जीवनावश्यक गोष्टींचा बाजार आहे की गर्दीमुळे कोरोनाचा बाजार आहे हा प्रश्न समोर आला आहे. अनावश्यक गर्दीमुळे इथे मोठ्या प्रमाणात नागरिक जमत असून त्यातील काही लक्षणे असलेली व नसलेली पॉझिटिव्ह रुग्ण असण्याची शक्यता असल्याने धोका वाढला आहे. शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक सर्रास ये जा करीत असल्याने इथे मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाची देवाण घेवाण होत आहे. दवाखाने , बाजारपेठ , दुकाने कोरोना वाटप केंद्र ठरत आहेत ? तर ब्रेक द चेनसाठी प्रशासन व इतर यंत्रणा प्रयत्न करीत असताना काही नागरिकमुळे ही मोहीम अपयशी ठरत असुन लिंक द चेन ठरत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक विना मास्क फिरत आहेत, प्रशासनाने लाखो रुपयांचा दंड ठोठावला तरी देखील काहीजण सुधारले नाहीत, अनेक जणांचा मृत्यू झाला तरी देखील स्तिथी जैसे थेच आहे त्यामुळे आता प्रशासनाने कडक नियम करणे व 100 टक्के बंद करणे गरजेचे आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असला तरी अनेक नागरिक बेफिकीरपणे खुलेआम फिरत आहेत, बाजारपेठसह अनेक ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असून विनामास्क लहान मुले , ज्येष्ठ नागरिक व फळ भाजीपाला विक्रेते फिरत आहेत तरी देखील प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसून हा प्रकार कोरोनाला निमंत्रण देणारा ठरत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी दररोज 700 ते 800 रुग्ण सापडत असून 10 ते 15 जण मृत्यू होत आहेत तरी देखील लोक काळजी घेत नाहीत. बाजार , दवाखाने यासह अनेक ठिकाणी गर्दी होत आहे त्यामुळे नागरिकांनी वेळीच सजग होणे गरजेचे आहे.
उस्मानाबाद शहरासह ग्रामीण भागात कोरोना सुपर स्प्रेडर सुसाट आहेत तर गृहविलगीकरण केलेले अनेकजण मोकाट असल्याने कोरोना संसर्ग कसा व कधी कमी होणार ? हा प्रश्न समोर आला आहे. प्रशासनाने काही बदल करणे आवश्यक आहे तर कोरोना नियंत्रण ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून नागरिकांनी स्वयंशिस्त व नियमांचे स्वतः पालन करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात अनेक रुग्ण कोरोना उपचार घेत आहेत या पॉझिटिव्ह रुग्णांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक मित्र परिवार खुलेआम व सर्रास दवाखान्यात ये जा करीत असल्याने हा गट मोठा सुपर स्प्रेडर ठरत आहे. प्रशासनाने जिल्हा शासकीय रुग्णालयात या लोकांवर काही वेळा अचानक कारवाई करीत त्यांची कोरोना तपासणी केली त्यात काही जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले मात्र त्यातूनही लोकांनी धडा घेतलेला दिसत नाही शिवाय हा प्रकार आजही सर्रास सुरू आहे. शासकीय रुग्णालयात कारवाई होते मात्र खासगी रुग्णालयात तर रान मोकळे आहे तिथे ना नियम ना विचारणारा कोणी ? ये जा करण्याचा हा प्रकार बंद झाला तर रोजचा आकडा व संसर्ग काही प्रमाणात कमी होईल.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर ज्यांना कोरोनाची काहीच किंवा सौम्य लक्षणे आहेत त्यांना डॉक्टर यांच्या सल्याने गृहविलगीकरण म्हणजे होम आयसोलेशन केले जाते या काळात या लोकांनी घरातील इतर सदस्य यांच्यापासून लांब व सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे आहे शिवाय घराबाहेर न येणे गरजेचे आहे मात्र मला काहीच लक्षणे नाहीत त्रास नाही मग काय होणार ? या आवेशात काही मंडळी खुलेआम फिरत असल्याने कोरोना संसर्ग थांबण्याचे नाव घेत नसून कुटुंबातील अनेकजण पॉझिटिव्ह येत आहेत या बाहेर फिरण्याला आळा घालणे गरजेचे आहे