कैलास नाही का आला ? मंत्री तानाजीराव सावंतांनी केली खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे विचारणा – योगायोग की राजकारण ?
धाराशिव – समय सारथी
कैलास नाही का आला ? मंत्री तानाजीराव सावंतांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे विचारणा केल्यानंतर यायलेत असे उत्तर ओमराजे यांनी सांगितले आणि दोघात असलेला अबोला काही काळ संपला. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांची मंत्री सावंत यांनी केलेली विचारणा व खासदार ओमराजे यांच्याशी चालत केलेला संवाद पुन्हा एकदा चर्चेत आला. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमात हुतात्मा स्तंभाला पुष्पहार अर्पण केल्यावर निघताना हा प्रकार घडला.
एरव्ही भाषणातुन मंत्री सावंत हे पाटील व निंबाळकर यांच्यावर टक्केवारी, हप्तेखोरी, दलाल यासह अनेक खालच्या स्तरावर आरोप करतात, ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून यायची लायकी नव्हती मात्र माझ्यामुळे आमदारकी खासदारकी मिळाली यासह सावंत यांची अनेक वक्तव्य यापूर्वी गाजली आहेत. पालकत्व व वडीलधारी हा हक्क सांगत सावंत सोयीनुसार खासदार आमदार यांना खडेबोल सुद्धा सुनावतात.
मंत्री सावंत हे एकीकडे जाहीर टीका करतात व योग्य वेळ साधत गरजेनुसार त्यांच्याशी मोजकाच जाहीर संवाद साधून राजकीय सूचक इशाराही देतात. सावंत यांच्या अश्या भूमिकेने आमदार खासदार यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते देखील चक्रावले आहेत. सत्ता परिवर्तनवेळी सावंत यांच्यासोबत खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील हे आले नाहीत याची नाराजी व राग सावंत यांना आहे.
जेव्हा जेव्हा भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील मंत्री सावंत यांच्यावर भारी ठरत राजकीय व प्रशासकीय शह देतात तेव्हा सावंत खासदार-आमदार यांचा टेकू घेतात अशीही चर्चा कार्यकर्त्यात होत आहे.
यापुर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमात मंत्री सावंत यांनी खासदार व आमदार यांच्या खांद्यावर हात टाकत बळ दिले होते. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मंत्री सावंत यांच्या विरोधात जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक निधीच्या असमतोलतेबाबत लेखी तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे न करता नियोजन विभागाच्या सचिवाकडे केली व कागदोपत्री कोंडीत पकडले त्यानंतर दोघात दरी पडली होती.
राजकीय वैर वगैरे काही नसते ही संकल्पना तुम्ही काढून टाका,वेगळा अर्थ काढू नका, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत जयंतीला आलोत असे मंत्री सावंत यांनी स्पष्ट केले तर भाजप आमदाराचे गुण लक्षात आल्याने मंत्री सावंत यांनी संदेश दिला असेल असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले. प्रलोभन व दहशतीला भीक न घालता पडत्या पावसात अंधाऱ्या रात्री परतलो तो काय पक्ष सोडायला असे सांगत आमदार कैलास पाटील यांनी राजकीय किनार नसल्याचे स्पष्ट केले.
मेडिकल कॉलेज हे गावसूद रोड भागात करण्याचे आदेश मंत्री सावंत यांनी देत अधिकाऱ्यांसह तिथे जागेची पाहणी केली त्यानंतर त्या दृष्टीने हालचाली झाल्या मात्र आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मेडीकल कॉलेजची जागा आयटीआय येथेच योग्य असल्याचे सांगत तिथेच जागा मंजुर करुन घेतली. आमदार राणा यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच नातलग असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही पाठबळ मिळाले. मेडिकल कॉलेज जागेच्यानंतर मंत्री सावंत यांचा पहिला दौरा होता त्यात त्यांनी आमदार राणा यांच्याशी अबोला ठेवत खासदार ओमराजे यांच्याशी संवाद साधला.
राजकारणात कोणीच कोणाचा कायम शत्रू व मित्र नसतो असे मंत्री सावंत नेहमी जाहीर भाषणात सांगतात. खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांनी मंत्री सावंत यांच्या मतदारसंघात जात सभा घेत सावंत यांना बारीक चिमटे घेतले ते चांगलेच चर्चेला सुद्धा आले. आमदार राणा पाटील यांनी कुरघोडी केली की मंत्री सावंत खासदार आमदार यांच्याशी संवाद साधतात हा एक प्रकारे योगायोग सुद्धा असू शकतो.
यावेळीच्या संवादानंतर मंत्री सावंत, खासदार ओमराजे, आमदार कैलास पाटील यांनी प्रतिक्रिया दिली नाही.