केंद्रीय भांडार मुंबई या संस्थेला उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेला 13 लाख 90 हजार रुपयांचा चेक नियमबाह्य पद्धतीने एका खासगी पतसंस्थेत बोगस खाते काढून रक्कम हडप केल्याच्या प्रकरणी चौकशीला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतली असून स्वतः त्या या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. चेक हडप प्रकरणाची लेखी तक्रार करून भांडाफोड करणारे तक्रारदार अविनाश गडदे यांना जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी नोटीस बजावली असून 26 जून 2020 रोजी सकाळी 11 वाजता पुराव्याच्या कागदपत्रासह हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. स्वत: जिल्हाधिकारी चौकशी करणार असल्याने या घोटाळ्यातील टोळीचे धाबे दणाणले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने शासकीय कागदपत्रांचे स्कॅनिंग व 6 क्षेत्रीय कार्यालयात 22 कॉम्पॅक्टर बसविण्याचे काम केंद्रीय भांडार मुंबई या संस्थेला दिले होते. या कामासाठी पुरवठा आदेशाच्या 98 टक्के रक्कम आगाऊ अॅडव्हान्स म्हणून देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाने 1 कोटी 39 लाख रुपये केंद्रीय भांडारला 18 मे 2015 रोजी अॅडव्हान्स दिले. त्यानुसार या संस्थेने काम केले व 10 टक्के डिपॉझिट रक्कमेची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी केली मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाने यापूर्वीच 13 लाख 90 हजाराचा चेक दिल्याचे लेखी कळविले आणि त्यानंतर हे चेक विल्हेवाट व बोगस खाते प्रकरण उघडकीस आले.