कॅबिनेट मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचा आजचा उस्मानाबाद जिल्हा दौरा रद्द
विनायक मेटे यांना मंत्री सावंत यांनी शोकसभा घेऊन वाहिली श्रद्धांजली
उस्मानाबाद – समय सारथी
कॅबिनेट मंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांचा आजचा उस्मानाबाद जिल्हा दौरा रद्द झाला असून ते आज परंडा, भूम, वाशी कळंब व उस्मानाबाद तालुक्यात जाणार होते. आजचे सर्व कार्यक्रम रद्द झाले असून ते आज कुठेही हारे-तुरे सत्कार स्वीकारणार नाहीत.शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्याने सावंत यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
विनायक मेटे यांचे निधनाने मराठा समाजाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. मराठा समाजासाठी त्यांचे मोठे योगदान होते. मराठा आरक्षणाचा लढा चालूच ठेवू हीच विनायक मेटे यांना खरी श्रद्धांजली अश्या शब्दात मंत्री तानाजी सावंत यांनी विनायक मेटे यांना बार्शी येथे शोकसभा घेऊन श्रद्धांजली वाहिली.
मराठा समाजाच्या बैठकीसाठी मुंबई येथे जात असताना मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला व त्यात त्यांचे निधन झाले. मराठा समाजाला धक्का आहे, एक मोठे नेतृत्व समाज भूषण एक हिरा गमावला आहे, दिवा आज आपल्यातून मालवला आहे. मेटे यांनी मराठा समाज सोडून त्यांनी आयुष्यभर काम केले नाही, सत्ता कोणाची असली तरी त्यांनी दबावाखली न दबता समाजाच्या मागणीसाठी लढा दिला.
चार दिवसापूर्वी माझी त्यांची भेट झाली होती आम्ही एकत्र बसून मराठा आरक्षण लढा कसा दयचा, सुप्रीम कोर्टात नेमकी भूमिका काय घ्यायची याचे सगळे नियोजन व पुढील दिशा ठरली होती. अधिवेशननंतर आरक्षण लढ्याचा पुढील टप्पा कसा करायचा हे ठरले होते. चार दिवसापूर्वी भेटलेला माणूस आपल्यात नाही हे बुद्धीला न पटणारे व धक्कादायक आहे,हे सहन न होणारे आहे. मराठा समाजाला व मेटे कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
प्रत्येकावर हा घाला होणार आहे मात्र मेटे यांचे असे काही होईल हे अपेक्षित नाही, कधीही न भरून येणारी हानी आहे असे सांगत मंत्री सावंत यांनी श्रद्धांजली अर्पण केली.