कुतवळ हॉस्पिटलचा परवाना रद्द – चुकीची वैद्यकीय सेवा देणे भोवले
तुळजापूर – समय सारथी , कुमार नाईकवाडी
तुळजापूर येथील नामांकीत कुतवळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन परवाना रद्द करण्यात आला असुन याबाबतचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ धनंजय केशव पाटील यांनी काढले आहेत. एका रुग्णाला चुकीची वैद्यकीय सेवा दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. परवाना रद्द झाला असला तरी आता रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद होणार का ? हे पाहावे लागेल.
कुतवळ रुग्णालयात 18 वर्षीय प्रतीक्षा प्रकाश पुणेकर या रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला होता, हा मृत्यू चुकीच्या वैद्यकीय सेवा दिल्याने झाल्याचा आरोप करीत डॉ दिग्विजय कुतवळ यांच्यावर गुन्हा नोंद करून वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द करीत कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली होती त्यानुसार तीन सदस्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती त्यानुसार केलेल्या शिफारशीनुसार परवाना रद्द केला आहे.
चौकशी समितीचे अध्यक्ष तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ वसंत बाबरे, डॉ आर यु सूर्यवंशी, डॉ ए एस धुमाळ या 3 तज्ञ डॉक्टर यांच्या समितीने डॉ कुतवळ व त्यांच्या रुग्णालयातील कारभार बाबत अनेक आक्षेप व अभिप्राय नोंदविले आहेत. डॉ दिग्विजय कुतवळ हे शासकीय वैद्यकीय अधिकारी यांनी व्यवसायरोध भत्ता (एनपीए) घेऊन सुद्धा ते खासगी दवाखाना चालवतात हे नियमबाह्य आहे. प्रतीक्षा पुणेकर हिच्या उपचार दरम्यान तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक होते परंतु तो घेतला नाही. रुग्णाच्या नातेवाईक यांनी पुढील उपचार करिता वारंवार विनंती करून सुद्धा रेफर केले नाही. संबंधित रुग्णालयाने मृत्यूचे प्रमाणपत्र दिले नाही तसेच मृत्यूच्या कारणासाठी शवविच्छेदन केले नाही. चौकशी समिती व सदस्य यांनी या प्रकरणाचे निरीक्षण केले असता रुग्णाचा मृत्यू हा प्लमोनरी odema मुळे झाला असावा असे नमूद केले आहे.
डॉ कुतवळ रुग्णालयाचा परवाना रद्द केला असला तरी त्यांच्यावर रुग्णच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी मयत मुलीचे वडील प्रकाश पुणेकर यांनी केली असून याबाबत आपण न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. या प्रकरणात मयत प्रतीक्षा हिच्या नातेवाईक यांनी अनेक निवेदने, आंदोलने केली होती त्यानंतर चौकशी समिती व ही कारवाई केली असली तरी डॉ कुतवळ यांना फौजदारी कारवाई पासून वाचविण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाच्या यंत्रणेने केला असल्याचा आरोप होत आहे.
Bogas doctor ahe . Wrong treatment. Question is how he is running hospital till the date. He don't know how to treat patient
काही प्रकरणे असतील तर माहिती द्या पाठपुरावा करू