कसरत – ऑक्सिजन सिलेंडर साठा नियमीत ठेवण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न
काही खासगी रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरचा शुक्रवारी तुटवडा,उसनवारीवर अवलंबुन
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हयात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात रुग्णांचे भरती होण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयात शुक्रवारी दुपारी ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा जाणवला त्यामुळे प्रशासनासह आरोग्य यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली. अखेर रात्री जिल्हा शासकीय रुग्णालयात तामलवाडी येथील ७ मेट्रिक टन ऑक्सिजन सिलेंडर गाडी आल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. उस्मानाबाद जिल्हयात ऑक्सिजन सिलेंडर साठा नियमीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत मात्र त्यांना दररोज साठा नियमित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या अडचणी व समस्यांना सामोरे जाताना कसरत करावी लागत आहे.
शुक्रवारी अनेक खासगी रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा असल्याने त्यांनी एकमेकांना व जिल्हा शासकीय रुग्णालयातून उसनवारीवर ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिल्याने आजचा दिवस तरी दिलासा मिळाला. जिल्हा शासकीय रुग्णालयातून रेमडीसीवीर इंजेक्शनचा खासगी रुग्णालयात उपचार गेहत असलेल्या गरजू रुग्णांना अडचणीच्या काळात पुरवठा केला जात आहे तसाच पुरवठा ऑक्सिजन सिलेंडरचाही केला जात आहे हि बाब दिलासादायक आहे.
उस्मानाबाद जिल्हयाला ऑक्सिजन साठा मिळावा यासाठी प्रशासकीय यंत्रणा महाराष्ट्राबाहेर सुद्धा प्रयत्न करीत आहे. उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातील लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारला असून त्याची चाचणी होणे बाकी आहे ती झाल्यानंतर हा प्लांट सुरु झाल्यास काही प्रमाणात ऑक्सिजन सिलेंडरची समस्या कमी होणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या आकडेवारीने ५०० चा टप्पा पार केला असून शुक्रवारी ५६४ रुग्ण सापडले तर जिल्हयात ३ हजार ६०२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. वाढत्या रुग्ण संख्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे असल्यावर ती अंगावर न काढता तात्काळ रुग्णालयात जाणे गरजेचे आहे आहे जेणेकरून रुग्णाची स्तिथी गंभीर होऊन ऑक्सिजन लागणार नाही किंवा अन्य अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन काम करीत असले त्यांना लोकांच्या साथीची गरज आहे त्यासाठी नागरिकांनी विनाकारण बाहेर न फिरणे, मास्क घालणे , सॅनिटायझर वापरणे तसेच सोशल डिस्टन्ससह अन्य नियमांचे पालन करून स्वतःची व स्वतःचे कुटुंब सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. आगामी काळात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.