कलह – आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी सचिवाकडे केली जिल्हाधिकाऱ्यांची लेखी तक्रार
विशेष कार्यकारी अधिकारी रेड्डी यांना जिल्हाधिकारी दिवेगावकर यांची दमदाटी, फौजदारी गुन्ह्यांची धमकी
उस्मानाबाद – समय सारथी
आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सोमनाथ रेड्डी यांना उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी फोनवरून दमदाटी केल्याचे प्रकरणी खुद्द आरोग्यमंत्री सावंत यांनी जिल्हाधिकारी यांची राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. सदरील बाब ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असून शासनाची प्रतिमा मलीन करणारी आहे व मंत्री आस्थापनेच्या कामात अडथळा निर्माण करणारी आहे असे तक्रारीत नमूद करीत जिल्हाधिकारी यांना योग्य ती समज देण्याची विनंती केली आहे. विशेष कार्यकारी अधिकारी यांना दमदाटी केल्याचे प्रकरण मंत्री सावंत यांनी गांभीर्याने घेतले आहे.
विशेष कार्यकारी अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी मंत्री सावंत यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्या विरोधात लेखी तक्रार केली असून त्यात सर्व वृत्तांत मांडला आहे. 18 ऑगस्टपासून मंत्री सावंत यांच्या निर्देशानुसार रेड्डी हे काम पाहत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सावंत यांच्या निर्देशानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील सद्य स्तिथीमध्ये असलेल्या कामांची व प्रगती अहवाल माहिती मी अधिकारी यांच्याकडून गोळा करीत आहे. हे काम करीत असताना जिल्हाधिकारी यांनी त्यांचे लघुलेखक व स्वीय सहायक डी एस कुलकर्णी यांच्या मोबाईल फोनवरून 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता फोन केला व सदरील माहिती कोणत्या अधिकारात संकलित करीत आहेत याबाबत विचारणा केली त्यानंतर मंत्री सावंत यांच्या निर्देशानुसार मी हे करीत असल्याचे सांगितल्यावर त्यांनी अर्वाच्छ शब्दात दाब दिला व माहिती गोळा करू नये असे सांगितले. माहिती संकलित केल्यास तुम्ही फौजदारी गुन्ह्यास पात्र राहाल तसेच जिल्हाधिकारी माझ्यावर शासकीय कामात ढवळाढवळ केल्याचा गुन्हा नोंद करतील असा दम दिला व यापुढे कार्यालयाच्या परिसरामध्ये मी येऊ नये अशी धमकी दिली.
मंत्री यांचे निर्देश व जबाबदारी याचे पालन करताना जिल्हाधिकारी यांच्या निर्देशात विरोधाभास निर्माण झाला आहे त्यामुळे माहिती संकलनासाठी मदत करावी शिवाय मंत्री आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी अशी दमदाटी करू नये असे निर्देश जिल्हाधिकारी यांना द्यावी अशी तक्रार रेड्डी यांनी मंत्री सावंत यांच्याकडे केली त्यानुसार सावंत यांनी मुख्य सचिव यांच्याकडे तक्रार केली आहे.
महाविकास आघाडी सरकारने सत्तासंघर्षाच्या काळात काळात मंजूर केलेल्या अनेक कामाना शिंदे-भाजप सरकारने स्थगिती दिली आहे तर अनेक कामे नियमबाह्य केली असल्याची तक्रारी आहेत त्यांची चौकशी बाकी आहे. जिल्ह्यातील माहिती मंत्री सावंत यांनी संकलन करणे जिल्हाधिकारी यांना खटकले, की रेड्डी यांची मंत्री सावंत यांनी त्यांच्या अधिकारात केलेली नेमणूक ? याबाबत चर्चा रंगली आहे.
यापूर्वी रेड्डी हे तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या काळात उस्मानाबाद येथे सहायक जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून कार्यरत होते. महसूलमधील जुन्या- नवीन अधिकारी लॉबीगच्या वादाची या दमदाटी प्रकरणाला किनार असल्याचे बोलले जात आहे तसेच मंत्री सावंत यांनी रेड्डी यांची केलेली नेमणूक जिल्हाधिकारी दिवेगावकर यांना रुचली नसल्याची देखील चर्चा आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच अश्या स्वरूपाचा प्रशासकीय वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान मंत्री सावंत व जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.