करारनामा – तेरणा कारखाना भैरवनाथ समुहाला देण्यावर शिक्कामोर्तब
जिल्हा बँकेच्या संघर्ष व पाठपुराव्याला यश – आता प्रत्यक्ष ताबा दिला जाणार
उस्मानाबाद – समय सारथी
मराठवाड्यातील सर्वात पहिला कारखाना असणारा तेरणा शेतकरी साखर कारखाना आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ समूहाला देण्याच्या 25 वर्षाच्या करारावर सोमवारी स्वाक्षरी करण्यात आल्या. जिल्हा बँक, कारखाना अवसायक व भैरवनाथ समूह यांच्यात हा लेखी करार करण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर हा करारनामा करण्यात आला. तेरणा कारखान्याला सध्या भविष्य निर्वाह निधी विभागाचे सील असुन त्यांची थकीत रक्कम दिल्यावर पुढील मार्ग सोपा होणार आहे. तेरणेचा करारनामा झाला आता प्रत्यक्ष ताबा दिल्यावर भैरवनाथ समूहाला दुरुस्ती व इतर कामे करता येणार आहेत. तेरणा व जिल्हा बँक या दोन्ही संस्था आर्थिक अडचणीतुन बाहेर येऊन कर्मचारी, शेतकरी व सभासद यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार व सर्व संचालक मंडळाने सुरू केलेल्या संघर्षाला अखेर यश मिळाले आहे.
तेरणा कारखाना व जिल्हा बँक या दोन्ही संस्था संकटातून वाचाव्यात यासाठी बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार यांनी संचालक यांना विश्वासात घेत न्यायालयासह प्रशासन व सरकार दरबारी अशी तिन्ही बाजूची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली व प्रत्येक समस्या व अडचणीवर कायदेशीर तोडगा लढत मार्ग काढला. भविष्य निर्वाह विभागाचा प्रश्न पण लवकर मार्गी लावून तेरणेचा ताबा भैरवनाथला देणार असल्याचे बिराजदार यांनी सांगितले.
तेरणा यावर्षीच्या गळीत हंगामात सुरू करण्यासाठी भैरवनाथ समूह प्रयत्न करीत असुन मार्च – एप्रिल महिन्यात चाचणी गळीत हंगाम सुरू करण्याचा संकल्प आहे . तेरणा लवकर सुरू करण्यासाठी भविष्य निर्वाह निधी विभागाची देणे व नंतर भाडेतत्वावर देण्याचा करार करून प्रत्यक्ष कारखाना भैरवनाथ समूहाच्या ताब्यात देणे गरजेचे आहे.भविष्य निर्वाह निधीची 5 कोटी देणे व त्यावरील व्याज असे 10 कोटी देणी बाकी आहेत. ही देणी दिल्यावरच तेरणाचे सील निघणार असुन कारखाना भैरवनाथला देणे शक्य होणार आहे. भाडेतत्वावर लिलाव प्रक्रियेतुन 5 कोटी मिळाली असून उर्वरित व्याजाच्या रकमेची हप्ता पाडून घेणे गरजेचे आहे. व्याजाच्या रकमेचे 36 हप्ते पाडून देण्याची व सील काढण्याची प्रक्रिया लवकर झाली तरच कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा देता येणार आहे. ही सर्व कागदोपत्री प्रक्रिया दिल्लीच्या कार्यालयात होणार असुन त्यादृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे.
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्याबाबत भैरवनाथ शुगर यांच्या सोबत लेखी करारपत्र झाले. याबद्दल भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा शिवाजीराव सावंत , जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, रविराज सावंत तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार, उपाध्यक्ष कैलास शिंदे यासह संचालक मंडळ यांचे अभिनंदन करून नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संचालक सुनील (मालक) चव्हाण, संजय देसाई, काकासाहेब शिनगारे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते