कबर खोदणाऱ्याचा मुलगा झाला गोंदियाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश
प्रेरणादायी – न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांना पदोन्नती
उस्मानाबाद – समय सारथी
समाजातील एखाद्या बांधवाचे निधन झाल्यानंतर त्याची कबर खोदून मिळणाऱ्या पैशातून संसाराचा गाडा हाकणाऱ्या इचलकरंजी येथील अब्दुल रजाक यांचा मुलगा न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी न्यायिक क्षेत्रातील मैलाचा दगड समजल्या जाणाऱ्या प्रमुख जिल्हा न्यायाधीश पदाला गवसणी घातली असून त्यांची गोंदिया या ठिकाणी प्रमुख जिल्हा न्यायाधीशपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे.
कर्नाटक येथील बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी हे न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांचे मूळ गाव , वडील अब्दुल रज्जाक हे जमखंडी चे संस्थानिक पंतप्रतिनिधी परशुराम पटवर्धन सरकार यांच्याकडे नौकरीस होते, घरचे अठराविश्व दारिद्र्य त्यातच पदरी पाच मुली आणि दोन मुले असा मोठा परिवार यामुळे नोकरीवर संसाराचा गाडा हाकता न आल्यामुळे अब्दुल रज्जाक हे इचलकरंजी या ठिकाणी वास्तव्यास आले, त्या ठिकाणी त्यांची अर्धांगिनी शहजादा यांनी आजूबाजूच्या लोकांची धुणी भांडी करण्याचे काम सुरू केले तर अब्दुल रजाक समाजातील एखादा बांधव मयत झाल्यानंतर त्याची कबर खोदाईसाठी जायचे, दुसऱ्याच्या मृत्यूवर औटी कुटुंबाचा डोलारा चालायचा. संकटे कोसळताना त्यांना सीमा नसतात त्याप्रमाणे न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी सहा महिन्याचे असताना त्यांना पोलिओ झाला. डॉक्टरांनी हा मुलगा आयुष्यभर अंथरूणावर खिळून राहील असा वैद्यकीय अंदाज वर्तवला होता. जवळपास अकरा वर्ष त्यांनी अंथरुणावरच काढली, त्यानंतर त्यांनी बाहेरून पहिलीत प्रवेश मिळवला मात्र इयत्ता दहावी पर्यंत त्यांना शाळेची पायरी प्रत्यक्ष चढता आली नाही. मित्रांच्या नोट्स वर अभ्यास करून त्यांनी दहावीपर्यंत मजल मारली परंतु बिकट परिस्थिती पाठ सोडत नव्हती. लॉटरीचे तिकीट विकणे, वर्तमानपत्र विकणे व हॅण्डलूम मध्ये काम करून त्यांनी कुटुंबाच्या नाजूक परिस्थितीत हातभार लावला, वकिलीची डिग्री संपादित केल्यानंतर तब्बल दोन वर्षे त्यांना काळा कोट विकत घेता आला नाही, मात्र न्यायाधीश पदाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यश संपादन केले आणि त्यांच्या आयुष्याला यू-टर्न मिळाला, न्यायाधीश पदी नियुक्त झाल्यानं पासून आजपर्यंत त्यांनी भूतकाळ स्मरणात ठेवत गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य पार पाडले.
पहिल्या पोस्टिंग पासून आज पर्यंत प्रत्येक ठिकाणी सर्वात प्रभावित न्यायाधीश म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. इंग्लिश वरील त्यांचे प्रभुत्व अनन्यसाधारण आहेत. न्यायदानात सोबत सामाजिक भान जपत त्यांनी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष म्हणून अलौकिक कार्य संपन्न केले आहे. कोरोना काळातील त्यांच्या कामगिरीची दखल वरिष्ठांनी घेतली आहे. त्यांच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीशपदी नियुक्तीची बातमी सातारा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश राजेंद्र सावंत यांना समजताच त्यांनी तातडीने कराड येथे एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा यथोचित गौरव केला. तसेच त्यांना कोविड योद्धा म्हणून गौरवले. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील न्यायिक क्षेत्रातील अधिकारी, कराड उपविभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी, सर्व कर्मचारी वर्ग व विधिज्ञ उपस्थित होते. प्रेरणादायी चित्रपटाच्या कथेला ही लाजवेल असा पूर्वाइतिहास असणारे अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व असून ते या पदाला न्याय देतील व साजेसे काम करतील. औटी यांच्या पदोन्नतीबद्दल त्यांच्या उस्मानाबाद येथील सहकारी व वकील संघ यांच्याकडून अभिनंदन होत आहे.