ओमीक्रॉनच्या रूग्णांची अफवा अंगलट – उस्मानाबाद येथील लॉ कॉलेजच्या प्राचार्यांना नोटीस
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 2 ओमीक्रॉन बाधित रुग्ण सापडल्याची खोटी अफवा पसरविल्याप्रकरणी उस्मानाबाद शहरातील नामांकीत डॉ बापूजी साळुंखे लॉ कॉलेजचे प्राचार्य वैजिनाथ शिंदे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.प्राचार्य व महाविद्यालय प्रशासनाने तीन दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश वैद्यकीय अधिकारी डॉ ए ए लोखंडे यांनी दिले आहेत त्यामुळे खळबळ उडाली आहे.
लॉ कॉलेजच्या नोटीस बोर्डवर उस्मानाबाद जिल्ह्यात ओमीक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आल्याची खोटी सूचना देण्यात आली होती. ही एक सूचना देताना महाविद्यालय प्रशासनाने कोणतीही शहानिशा केली नाही त्यामुळे उस्मानाबाद तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे असा ठपका नोटीसीत ठेवण्यात आला आहे. उस्मानाबाद तालुक्यामध्ये विदेशातून आलेल्या नागरिकांपैकी एक नागरिक कोरोना बाधित आढळला असून त्याच्या संपर्कातील दोन व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहेत परंतु त्यापैकी कोणत्याही व्यक्तीला ओमिक्रॉन संसर्गाची लागण झाल्याचे अद्याप तरी निष्पन्न झाले नाही. त्यांचे जीनोम सिक्वेन्स अहवाल अध्याप प्रलंबित असून कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता महाविद्यालय प्रशासनाने खोटी अफवा पसरविल्याने त्याचा खुलासा सादर करावा लागणार आहे.
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना सुचित करण्यात येते की, आपल्या जिल्ह्यात ओमीक्रॉन बाधित दोन रुग्ण आढळून आल्याने सर्वानी मास्क वापर करावा व कोविडच्या नियमांचे पालन करावे तसेच महाविद्यालयात असताना व वावरताना सुरक्षित अंतर ठेवावे अशा आशयाची सूचना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली होती. या नोटीस बोर्डवरील सूचना उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक सोशल मीडियाच्या ग्रुपवर वायरल झाली होती त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या चुकीच्या नोटीसीने आता महाविद्यालय प्रशासनाची चांगलीच गोची केली आहे.