ओमीक्रॉनचा उस्मानाबाद जिल्ह्यात संसर्ग, 2 रुग्ण – चिंता वाढली
युएईहुन बावी येथे आलेला रुग्ण ओमीक्रॉन पॉझिटिव्ह आल्याने खळबळ – बावीत कलम 144 लागू
उस्मानाबाद – समय सारथी
शारजा,युएई (संयुक्त अरब अमिरात) हुन उस्मानाबाद जिल्ह्यात आलेला 42 वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता त्या रुग्णाचा ओमीक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उस्मानाबाद आरोग्य विभागाने 5 नमुने ओमीक्रॉन चाचणीसाठी पाठविले होते त्यापैकी 2 अहवाल ओमीक्रॉन पॉझिटिव्ह आले आहेत यात बावी येथील तरुण व त्याच्या घरातील एकजण पॉझिटिव्ह आला आहे. बावी येथील या तरुणाच्या संपर्कातील आणखी काही जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत मात्र त्यांचा ओमीक्रॉन अहवाल येणे अद्याप बाकी आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील परदेश दौरा करून आलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला त्याच्या संपर्कातील 2 जण पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाचे निदान झाल्यावर व त्यापूर्वी म्हणजे परदेश दौरा केल्यावर गावात आल्यावर हा व्यक्ती खुलेआम विनामास्क गावभर गाठीभेटी घेत फिरला. या व्यक्तीमुळे संपूर्ण गावाचा जीव टांगणीवर आला आहे त्यातच त्याचा ओमीक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंतेत भर पडली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील बावी या गावात कोरोनाचे 3 रुग्ण सापडल्याने या गावाच्या सीमा बंद करून कलम 144 लागू करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर डॉ योगेश खरमाटे यांनी काढले आहेत. बराच अवधीनंतर उस्मानाबाद जिल्ह्यात एखादया गावाच्या सीमा बंद करण्याचे आदेश दिल्याने पुन्हा एकदा कोरोनाची धाकधूक वाढली आहे.
बाबी या गावातील कोरोनाचा संसर्ग वाढू न देण्यासाठी तातडीने नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने हे आदेश काढण्यात आले असून बावी गावाच्यापासून तीन किलोमीटर पर्यंतच्या परिसरातील नागरिकांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. 3 किलोमीटरचा पर्यंतचा परिसर रेड झोन तर 7 किलोमीटर पर्यंतचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
बावी या गावात हे आदेश आजपासून लागू होणार आहेत, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार हे आदेश लागू करण्यात आले असून या गावात नागरिकांना फिरण्यास मज्जाव घालण्यात आला आहे तसेच बावी या गावातील सीमा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी ग्रामीण पोलिसांनी करायचे असून या गावात ठराविक वेळेत अत्यावश्यक सेवा पुरवण्याची मुभा राहील. अत्यावश्यक सेवा पुरविताना सोशल डिस्टन्सचे पालन करणे बंधनकारक असणार आहे असे आदेश उपविभागीय दंडाधिकारी डॉ खरमाटे यांनी काढले आहेत.