एसटी मंडळाच्या स्थापत्य कामात १९ लाखाचा घोटाळा; विभागीय अभियंत्यासह दोघांना पोलीस कोठडी
पाणी टाकी, शेड, शौलालयासह अनेक कामात गैरव्यवहार
निकृष्ट कामासह कामे न करता लाटला निधी
उस्मानाबाद – समय सारथी
राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद येथील स्थापत्य कामात १९ लाख ८२ हजार ७३० रुपयाचा घोटाळा केल्याप्रकरणी तत्कालीन विभागीय अभियंता गणेश राजगिरे व कनिष्ठ अभियंता राहुल पवार यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना उस्मानाबाद येथील मुख्य न्यायदंडाधिकारी इवरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाचे उस्मानाबाद येथील सुरक्षा व दक्षता अधिकारी दिपक जाधव यांना मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयाने उस्मानाबाद येथील विभागीय कार्य शाळेअंतर्गत झालेल्या स्थापत्य कामाची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जाधव यांनी १ सप्टेंबर २०१७ ते ३० मार्च २०१९ या कालावधीत झालेल्या स्थापत्य कामांची चौकशी केली. या चौकशीत गंभीर बाबी चव्हाट्यावर आल्या. स्थापत्य कामे न करताच काम झाल्याचे दाखवून निधी लाटण्यात आला. शिवाय जी कामे झाली ती देखील निकृष्ट दर्जाची करण्यात आली होती. सुरक्षा भिंत, पत्रा शेड, शौचालय, पाणी टाकी, सायकल स्टॅन्ड शेड, वॉचमन टॉवर आदी कामात मोठा घपळा करण्यात आला. तत्कालीन विभागीय अभियंता गणेश सदाशिव राजगिरे (रा. लातूर) व कनिष्ठ अभियंता राहुल भारत पवार (रा. तुळजापूर) यांनी स्थापत्य कामात एकूण १९ लाख ८२ हजार रुपयाचा घोटाळा करून अपहार केल्याचा ठपका जाधव यांनी चौकशी अहवालात ठेवला होता. रा.प.महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी संबंधिताविरूध्द गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन विभागीय अभियंता राजगिरे व कनिष्ठ अभियंता पवार यांच्याविरूध्द कलम ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४७१, ३४ भादंविनुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. या दोघांनीही अटकपूर्व जामीनसाठी प्रारंभी उस्मानाबाद न्यायालय येथे अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दिला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्याने त्यांनी नंतर उच्च न्यायालय व पुन्हा सुप्रिम कोटात धाव घेतली होती. परंतु दोन्ही ठिकाणी त्यांचा अर्ज फेटाळण्यात आले.त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोनि मोदे , सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख यांच्या पथकाने राजगिरे व पवार यांना २७ ऑक्टोबर रोजी अटक केली. त्यांना उस्मानाबाद येथील न्यायालयात हजर केले असता प्रांरभी ४ दिवस व नंतर २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्या दोघांची पोलीस कोठडी मुदत संपली असल्याने सोमवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक शेख हे करीत आहेत.