धाराशिव – समय सारथी
कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा भक्कम आशीर्वाद पाठीशी आहे. आई तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादानेच मंदिर जीर्णोद्धाराचे अभुतपुर्व काम पूर्णत्वास जाणार आहे. त्यासाठी तुळजाभवानी देवीचे महंत, तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष, पुजारी बांधवही उत्स्फूर्तपणे तयार आहेत. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जीर्णोद्धारासाठी एकोप्याने काम करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी माहिती आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. आई तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने या निर्णयाचे सर्वांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
तुळजापूरच्या बदनामीचे षडयंत्र करणारा सूत्रधार शोधा, अपप्रचार थांबवण्यासाठी हे षडयंत्र तातडीने उघड करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधितांची लवकरात लवकर बैठक घ्या अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी संस्कृती मंत्री आशिष शेलाराकडे केली होती, त्यानुसार बैठक संपन्न झाली. मुंबई ‘वारी’ होऊनही ‘षडयंत्र’ करणारे कोण हे अद्याप समोर आले नाही.
श्री तुळजाभवानी मंदिराच्या जतन व संवर्धनासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या महत्त्वपूर्ण बैठकीत सर्व कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गाभाऱ्याच्या मजबुतीकरणासोबतच धार्मिक परंपरा आणि श्रद्धेला बाधा न आणता उपाय शोधण्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिराच्या कळसाबाबत तसेच गाभाऱ्याच्या दुरुस्तीबाबत एएसआय (पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग) तज्ज्ञांची, आयआयटी तज्ज्ञांची मदत घेण्याचे ठरले आहे. पुढील 30 दिवसांच्या आत त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे.
बैठकीस तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत तुकोजी बुवा गुरु बजाजी बुवा, मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर-कदम, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे, उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, पुजारी सचिन परमेश्वर- कदम, अनुप कदम, ॲड. शिरीष कुलकर्णी, पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक डॉ.तेजस गर्गे, राज्य पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.