उस्मानाबाद धाराशिव नामांतरण वाद – अबू आजमीची तोफ धडाडणार, उद्या घेणार बैठक
उस्मानाबाद – समय सारथी
समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आसिम आजमी हे उद्या 23 जुलै रोजी शनिवारी उस्मानाबाद व सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. उस्मानाबादचे धाराशिव व औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण शिंदे भाजप सरकारसह उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. या नामकरणला विरोध करण्यासाठी आजमी हे उस्मानाबाद येणार आहेत, आजमी यांनी याबाबत फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करुन माहिती दिली आहे.
आजमी हे दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेतील त्यानंतर हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी यांच्या दर्गाह येथे दुपारी 2 वाजता जिरायत, दुपारी 3 वाजता एस आर फंक्शन हॉल येथे उस्मानाबाद नामांतरण विरोधी समितीची बैठक घेतील व त्यानंतर 5 वाजता जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देतील. त्यानंतर ते रात्री 7 वाजता सोलापूर येथे कार्यकर्ता बैठक घेतील.
ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयानंतर शिंदे भाजप फडणवीस सरकारने नामांतरणचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला मुस्लिम समाजातून तसेच काही राजकीय पक्षाकडून विरोध होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकारी यांनी राजीनामा सुद्धा दिला आहे. शिंदे भाजप सरकारने निर्णय घेतल्यानंतर गूगलने मॅपवर धाराशिव संभाजीनगर उल्लेख केला.
आजमी हे महाविकास आघाडी सरकार सोबत होते मात्र नामांतरण झाल्यावर ते काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना महाविकास आघाडीवर नाराज झाले. सत्तातरणच्या वादावेळी व बहुमत चाचणी वेळी आजमी यांनी तटस्थपणाची भूमिका घेतली.