तीनही नदीवरील 24 ठिकाणांचे सर्वेक्षण – पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा निर्णय
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हयातील कोल्हापुरी बंधाऱ्यांचे उच्च पातळी बंधाऱ्यामध्ये (बॅरेज) रुपांतर करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मुंबईत दिली. मुंबई येथे मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते .यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर,आमदार कैलास पाटील,आमदार ज्ञानराज चौगुले, मृद व जलसंधारण विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जलसंधारण आणि जिल्हा परिषदेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील तीनही नदीवरील 24 ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करून गडाख यांनी या सर्व 24 ठिकाणांच्या कामांची तीन प्रकारात विभागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. यामध्ये जलसंपदा विभागाप्रमाणे जिल्हयातील तेर उच्चालक पध्दतीने आणि FRP पध्दतीने गेट टाकून दुरुस्ती असे तुलनात्मक अंदाजपत्रके बनविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला त्यांनी यावेळी दिल्या आहेत. तेरणा, मांजरा आणि बेनीतुरा नदीवरील उस्मानाबाद, कळंब, उमरगा, लोहरा आणि वाशी तालुक्यातील कोल्हापुरी पध्दतीच्या बंधाऱ्यांची उच्च पातळी बंधाऱ्यांमध्ये रुपांतर करण्यात येणार आणि त्याचप्रमाणे वडगाव (गांजा) तालुका लोहारा येथील साठवण तलावाचे काम तात्काळ सुरु करण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना पालकमंत्री यांनी यावेळी दिले.