उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे संचालक मंडळ उत्तरे देईल काय ?
माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांचा सवाल
आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी सुद्धा टोचले होते कान
उस्मानाबाद – समय सारथी
दर वर्षाप्रमाणे याही वर्षी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेची (मल्टीस्टेट) वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, 21 ऑगस्ट 2022 रोजी बोलावण्यात आलेली आहे. नेहमीप्रमाणेच बँकेचे छापील वार्षिक अहवाल काही ठराविक सभासदांनाच पाठविण्याचा सिलसिला यावर्षीही कायम ठेवण्यात आला.
बँकेच्या निधीमध्ये 30.46 टक्के वाढ झालेली असून तो रुपये 405.67 कोटीपर्यंत वाढलेला आहे. बँकेच्या गुंतवणुकीत गतवर्षीपेक्षा 1.86 टक्केप्रमाणे वाढ झालेली असून ती एकुण रूपये 1024.60 कोटी झालेली आहे. तर बँकेच्या ठेवी वाढीचे प्रमाण 3.43 टक्क्यांनी वाढलेले असून त्या रुपये 1814.29 कोटीपर्यंत वाढलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर कर्जवाटपही रूपये 51.37 कोटीने वाढलेले आहे. ते आता रूपये 1130.50 कोटीपर्यंत गेलेले आहे. त्याबद्दल चेअरमनसह सर्व संचालक व अधिकार्यांसह सर्व कर्मचार्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
बँकेच्या आर्थिक प्रगतीचा अहवाल सभासदांना देत असताना माझ्यासारख्या सामान्य सभासदांच्या मनात काही प्रश्न उपस्थित होतात. त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे बँकेचे चेअरमन व संचालक मंडळ देईल काय?
प्रश्न 1 – बँकेची एवढी चांगली आर्थिक परिस्थिती असताना बँकेचे मालक असणार्या सभासदांना लाभांश (डिव्हिडंट) जवळपास 15 ते 20 वर्षापासून का दिला जात नाही? बँकेच्या मालकाचे म्हणजेच भागधारक सभासदांचे किमान 50 कोटी रूपयांचे आतापर्यंत जे नुकसान झालेले आहे, त्याची भरपाई कोण आणि कशी करणार?
प्रश्न 2 – बँकेचे जवळपास 400 कर्मचारी आहेत. त्यांच्या परिश्रमाने बँकेची जी काही प्रगती झालेली आहे, त्याचा मोबदला म्हणून व त्यांचा कामाचा उत्साह वाढावा म्हणून त्यांना पगारवाढ व बोनस का दिला नाही?
प्रश्न 3 – बँकेच्या सेवेतून (नोकरीतून) मुक्त होत असताना बँकेच्या कर्मचार्यांचे बँकेच्या सभासदत्वाचे राजीनामे का घेतले जातात? हा नियम कोणी केला व का केला? त्याला कायदेशीर आधार आहे काय? हा नियम सर्वांनाच लागू असेल तर श्री.ब्रिजलाल मोदाणी व श्री.वसंतराव नागदे यांनी निवृत्तीनंतर बँकेच्या सभासदत्वाचा राजीनामा का दिला नाही? श्री.मोदाणी व श्री.नागदे यांनाच फक्त बँकेची निवडणूक लढवता यावी व इतर कर्मचार्यांनी या दोघांच्या पापाचे पाढे निवडणुकीत वाचू नयेत, म्हणून हा भेदभाव केला काय?
प्रश्न 4 – बँकेच्या छापील अहवालात 1 डिसेंबर 2021 पर्यंतचे माजी अध्यक्ष श्री.मोदाणी यांचे छायाचित्र छापले आहे. परंतु त्याच कालावधीपर्यंत इतर संचालक व कार्यकारी संचालक यांनी बँकेचे कामकाज पाहिले आहे, त्यांचे छायाचित्र का छापले नाही?
प्रश्न 5 – वर्षानुवर्षे एन.पी.ए. 10 टक्केपेक्षा जास्त कसा काय असू शकतो? देशातील सर्वात मोठी सारस्वत सहकारी बँकेची वसुली 99 टक्के असते व त्यांचा एन.पी.ए 1 टक्क्यापेक्षा जास्त असत नाही. त्या मानाने आपल्या बँकेचा एन.पी.ए.10 टक्केपेक्षा जास्त कसा काय असतो?
पश्न 6 – बँकेचा एन.पी.ए. एवढा वाढत असताना व बँकेचे मालक असणार्या भागधारक सभासदांना 1 रूपयाचा देखील लाभांश देत नसताना कर्जदारांना मात्र दरवर्षी कोट्यावधी रूपयांची कर्जात सूट का देण्यात आली? मागच्याच वर्षीचे उदाहरण घेतले तर तडजोड योजनेअंतर्गत रूपये 1485.66 कोटी इतक्या मोठ्या रकमेची सूट मर्जीतल्या कर्जदारांना का देण्यात आली? मागील अनेक वर्षाचे अहवाल वाचल्यास दरवर्षी आपल्या खास कर्जदारांस कोट्यावधीची सूट दिलेली आहे, हे लक्षात येईल. त्या संबंधीत कर्जदारांशी ‘अर्थपूर्ण’ वाटाघाटी करुन ‘वाटा’ कर्जदारास आणि ‘घाटा’ बँकेस असे बँकेच्या नुकसानीचे निर्णय कसे काय घेतले? ज्यांनी बेकायदेशीर कर्ज मंजूर केले. पुरेशी जामीन व पुरेसे तारण न घेता कर्ज मंजूर करणे, त्याचबरोबर बँकेचे आर्थिक नुकसान करणार्या तडजोड योजनेत त्या कर्जदारास मोठ्या प्रमाणात आर्थिक सवलत देऊन बँकेचे कोट्यावधी रूपयांचे दरवर्षी नुकसान करणार्या संचालक मंडळावर कायदेशीर कार्यवाही का केली नाही?
प्रश्न 7 – बँकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे बँकेच्या विस्ताराची म्हणजे नवीन शाखा उघडण्याची परवानगी मिळत नाही काय? नवीन क्षेत्र विस्तार तर दूरच, परंतु आपल्या कार्यक्षेत्रात गेली अनेक वर्षे अहमदनगर जिल्हा असताना त्या जिल्ह्यामध्ये देखील शाखा विस्तार का होऊ शकत नाही?
प्रश्न 8 – राज्य शासनाच्या कडक देखरेखीखाली व सभासदांच्या रास्त व योग्य तक्रारीला तोंड द्यावे लागू नये म्हणून आपल्या बँकेचे मल्टीस्टेट बँकेमध्ये रूपांतरण करण्यात आले आहे काय? ज्यामुळे संचालक मंडळाचा गैरकारभार व गैरव्यवहार वर्षानुवर्षे सुखेनैव व सुरळीतपणे चालू राहील याची काळजी संचालक मंडळाने घेतली आहे काय?
प्रश्न 9 – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे सर्क्युलर नं. RBI/2019-2020/128DoR(PCB)BPD. Cr.No. 8/1205-002/2019-20 Dated 31/12/2019 प्रमाणे Board of Management (BoM) ची स्थापना करणे बँकेवर बंधनकारक असताना व तशी बँकेच्या गेल्यावर्षीच्या संचालक मंडळात व सर्वसाधारण सभेत मंजुरी घेऊन तशी पोटनियमात दुरूस्ती केली असताना अद्याप पर्यंत Board of Management (BoM)ची नियुक्ती का करण्यात आली नाही? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे कोणत्याही एका सभासदाने त्याबाबत तक्रार केली तर व तसेच गेली अनेक वर्षे लाभांश न दिल्याबद्दल तक्रार केली तर त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतील, याची संचालक मंडळास कल्पना आहे काय?
प्रश्न 10 – बँकेच्या आर्थिक परिस्थितीची स्वच्छ व प्रामाणिक माहिती बँकेच्या सभासदांना व्हावी या शुद्ध हेतूने बँकेने ऑडिट वर्ग छापील अहवालात छापणे हे पारदर्शक कारभारासाठी आवश्यक आहे, असे संचालक मंडळास वाटत नाही काय?
वरील सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे संचालक मंडळाकडून मिळतील, एवढीच माफक अपेक्षा.
नानासाहेब हरिश्चंद्र पाटील
माजी नगराध्यक्ष, उस्मानाबाद
94224 64056
आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी सुद्धा टोचले होते कान
आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत हे 15 ऑगस्ट रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेत भेट देऊन संचालक मंडळाचे कान टोचले होते. बँकेच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी असून सभासद शेतकरी यांना योग्य सन्मान द्या कर्ज प्रकरणात त्यांना त्रास देऊ नका अन्यथा मी लक्ष दिले तर मोठी घाण बाहेर येईल अशा कडक शब्दात तंबी दिली होती.