उस्मानाबाद असे जिल्ह्याचे नाव वापरा – नाव न बदलण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांचे आदेश
धाराशिव – समय सारथी
महसूल व इतर विभागाच्या संबंधित कार्यालयांनी जिल्ह्याचे नाव उस्मानाबाद असे वापरावे असे लेखी आदेश जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी काढले आहेत. धाराशिव हे नाव शहराचे असुन तालुका व जिल्ह्याचे नाव उस्मानाबाद असे आहे त्यामुळे प्रशासकीय कामकाजात उस्मानाबाद असे नाव वापरावे असे आदेशीत केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव केल्याबाबत उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका दाखल असून नामांतराबाबत प्राप्त झालेल्या आक्षेपाची सुनावणी उच्च न्यायालयात चालू असताना महसूल व इतर विभागाची संबंधित कार्यालयाने जिल्ह्याचे नाव बदलत धाराशिव हे वापरत असल्याची बाब याचिकाकर्ते यांच्या विधीज्ञ प्रज्ञा सतीश तळेकर यांनी न्यायालयात निदर्शनास आणून दिले आहे. त्यावर उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत महसूल व इतर विभाग संबंधित कोणत्याही कार्यालयाने उस्मानाबाद जिल्ह्याचे नावात बदल न करणे याबाबत निर्देश दिले आहे. तरी जिल्ह्यातील महसूल व संबंधित विभागाने उच्च न्यायालय यांच्या आदेशाचे व सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी केले आहे.