उस्मानाबादचे सुपुत्र अजित टिके यांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ जाहीर, महाराष्ट्रासह जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब
उस्मानाबाद – समय सारथी
महाराष्ट्रासह उस्मानाबाद जिल्ह्यासाठी मान उंचावणारी अभिमानास्पद बातमी असुन सर्वोत्कृष्ट तपास व सेवेसाठी केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणारे ‘ केंद्रीय गृहमंत्री पदक’ उस्मानाबादचे सुपुत्र अजित राजाराम टिके यांना जाहीर झाले आहे. टिके हे सध्या सांगली शहर येथे पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत असून त्यांनी वाई येथे एकाच कुटुंबातील 4 जणांच्या खुनाचा तपास कोणताही पुरावा नसताना अत्यंत कौशल्याने करीत आरोपींना अटक केली होती. यासह त्यांनी पोलीस दलात आजवर केलेल्या सेवेची दखल थेट केंद्र सरकारने घेतली आहे.
अजित टिके हे वाई येथे कार्यरत असताना एका घाटात एक पूर्णपणे कुजलेला मृतदेह आढळून आला होता त्या ठिकाणी एक चिट्ठी वगळता इतर कोणताही पुरावा नव्हता. या चिठ्ठीवरून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली होती व त्यानंतर याचा तपास केल्यावर 4 खुनांची मालिका उघडकीस आली. यामध्ये आई वडील व दोन मुलांचा समावेश होता. होमगार्ड विभागात नौकरी लावतो म्हणून आरोपीने प्रथम दोन्ही भावांची हत्या केली व मुलांचा शोध घेणाऱ्या आई वडिलांचा खून करून चारही मृतदेह वाई येथील एका खोल दरीत फेकून दिले होते. हे कुटुंब सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील होते. या प्रकरणाचा तपास केल्याने टिके यांना हा पुरस्कार देण्यात आला असून त्याचे लवकरच वितरण होणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.
अजित टिके यांचे वडील उस्मानाबाद पोलीस दलात सेवेत होते. जिल्हा परिषदेत टिके यांनी काही काळ शिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. टिके यांनी आजवर पोलीस प्रशिक्षण केंद्र नाशिक, कोल्हापूर,सातारा जिल्ह्यातील वाई, गडचिरोली येथील धानोरा या नक्षलवादी भागात कार्य केले आहे. गडचिरोली येथे त्यांनी अनेक मोहीम यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत.
महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकाऱ्यांसह 152 पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना 2021 सालचे ‘केंद्रीय गृहमंत्रालयाचे उत्कृष्ट तपास व सेवासाठीचे पदक जाहीर करण्यात आले त्यात टिके यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील या 11 अधिकाऱ्यांचा समावेश –
ममता लॉरेन्स डिसूझा,पद्मजा अमोले बधे, एसीपी अलका धीरज जाधव, एपीआय, प्रीती प्रकाश टिपरे, एसीपी, राहुल धालसिंग बहुरे, एपीआय,मनोहर नरसाप्पा पाटील, पीआय,बाबुराव भाऊसाहेब महामुनी, डीवायएसपी,अजित राजाराम टिके, डीवायएसपी, सुनील शंकर शिंदे, इन्स्पे, सुनील देविदास कडासने, एसपी, उमेश शंकर माने पाटील, डीवायएसपी यांचा समावेश आहे.