कागदी तिकिटाला थुंकी, वाहक व प्रवाशी यांचे आरोग्य धोक्यात
छापील तिकीटांचा ताळमेळ जमेना, बसचे आर्थिक नुकसान ?
उस्मानाबाद – समय सारथी
एकीकडे केंद्र व राज्य सरकार डिजिटल इंडिया व ऑनलाईन प्रशासकीय यंत्रणेवर भर देत असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या बस मधील प्रवाशी तिकिट काढण्याच्या डिजिटल मशीन बंद पडल्या आहेत यामुळे वाहकांचे मोठे हाल होत आहेत. जिल्ह्यातील एसटी मंडळाच्या 6 आगारातील 1 हजार 12 पैकी 500 मशीन म्हणजे 50 टक्के मशीन बंद पडल्या असुन 512 मशीन सुरू आहेत तर एक मशीन गहाळ झाली आहे. या मशीन बंद पडल्याने वाहकांना प्रवाशांना तिकीट देण्यासाठी छापील कागदी तिकीट देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील प्रवासाचे महत्वाचे साधन असलेल्या एसटी महामंडळाचा प्रशासकीय प्रवास मात्र उतरतीला लागला आहे.
सध्या कोरोनाचे मोठे संकट असून सॅनिटायझर मास्क या गोष्टी अनिवार्य असताना प्रवाशांना कागदी छापील तिकीट द्यावे लागत आहे. हे कागदी तिकीट प्रवाशांना देण्यापूर्वी फाडताना थुंकी लावावी लागत असल्याने कोरोना संसर्गाची शक्यता व धोकाही वाढला आहे.या सर्व प्रकारामुळे वाहक व प्रवाशी या दोघांचा जीव व आरोग्य धोक्यात टाकण्याचे काम महामंडळ करीत आहे.याबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वाहकांनी केला आहे.
एसटी बसकडे पूर्वी सर्व मशीन या डिजिटल होत्या त्यामुळे एक क्लिक करून तिकिट काढणे सहज शक्य होते शिवाय या मशीनमध्ये सरकार एसटी महामंडळाच्या मार्फत प्रवासी दरात देत असलेल्या सवलतीची यादी व त्याचे दर फीड केले होते. प्रवाशी थांबा जवळ असो की लांब त्या तुलनेत तिकीट काढत येत होते शिवाय त्या तिकिटांचा हिशोब सहज जुळत होता मात्र कागदी तिकट वापरात खूप अडचणी आहेत. प्रत्येक थांबा झाला की हिशोब कागदावर नोंद घेऊन लिहणे शिवाय सवलत योजनांची तिकीट व इतर ताळमेळ घालणे वेळखाऊ आहे आणि यातून घोटाळा होत असून महामंडळचे आर्थिक नुकसान होत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील 6 विभाग पैकी उस्मानाबाद आगारात सर्वाधिक 115 मशीन खराब आहेत तर त्यापाठोपाठ कळंब 101,उमरगा 88,तुळजापूर 87,भूम 66 तर परंडा आगारात 43 मशीन बंद पडला आहेत त्या तात्काळ वापरात आणाव्यात अशी मागणी होते आहे.