उपोषणाला दुसरे यश – 282 कोटी नुकसानभरपाई निधी मागणीचा प्रस्ताव सादर, सरकारच्या निर्णयाकडे लक्ष
उस्मानाबाद – समय सारथी
आमदार कैलास पाटील यांच्या आमरण उपोषणाला दुसरे यश मिळाले आहे. विभागीय आयुक्तानी नुकसान भरपाई द्यावी यासाठी निधी मागणीचा लेखी प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे.
282 कोटी रुपयांची नुकसान भरपाई निधी द्यावी असा प्रस्ताव औरंगाबाद विभागीय आयुक्तानी मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर केला आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव रखडला होता असा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला होता मात्र त्यानंतर प्रशासनने तात्काळ हालचाली सुरु केल्या आहेत. उपोषणनंतर आज प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. आमदार कैलास पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 6 वा दिवस आहे.
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे 59 कोटी 87 लाख तर सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे 222 कोटी 73 लाख निधी देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी आज लेखी पत्र दिल्यावर त्या अनुषंगाने विभागीय आयुक्तानी निधी मागणीचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे.