उस्मानाबाद – समय सारथी
भूम येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांच्यासह कोतवाल विलास जानकर यांना वाळू माफियाकडुन लाच घेतल्याप्रकरणी भूम न्यायालयाने अखेर सशर्त जामीन मंजूर केला आहे. दरम्यान लाखोंची लाच घेणाऱ्या राशीनकर यांच्या भूम व अहमदनगर येथील घरझडतीत विशेष रोकड सापडली नसल्याचे समोर आले आहे. अहमदनगर येथील छाप्यात संपत्तीची काही कागदपत्रे सापडली असुन एका बँकेतील लॉकर अद्याप कुलूपबंद असल्याने त्याचा तपशील मिळाला नाही. लाखोंची लाच घेणाऱ्या राशीनकर यांच्याकडे घरझाडतीत काही हजारात किरकोळ रक्कम सापडल्याची सूत्रांची माहिती आहे. ज्या पद्धतीने लाचेची चर्चा झाली त्या तुलनेत काही हजार रक्कम सापडल्याचे कळते. दरम्यान राशीनकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असून याबाबत अद्याप निलंबनाचे आदेशवर सरकारने निर्णय घेतलेला नाही असे कळते. राशीनकर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने भूम उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा तात्पुरता पदभार उपजिल्हाधिकारी सचिन गिरी यांच्याकडे देण्यात आला आहे. राशीनकर यांच्या संपत्तीची खुली चौकशी करण्यात येणार आहे.
उपविभागीय दर्जाचा अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने जिल्हा प्रशासनातील काही भ्रष्टाचाराची पोलखोल झाली आहे. लाचेच्या रकमेत वाटेकरी कोण ? हा प्रश्न नेहमीप्रमाणे या प्रकरणातही कायम अनुत्तरीत राहील असे सध्या स्तिथीवरून दिसते.