उद्यापासून विशेष तपासणी मोहिम – वर्ग 2 जमिनी बाबत सुनावणी, लेखी म्हणणे मांडता येणार
उस्मानाबाद – समय सारथी
वतन, वकफ, सिलिंग, देवस्थान, कुळ यासह अन्य प्रकरणात समाविष्ट असलेल्या जमिनी शर्तभंग झाल्याने महसूल प्रशासनाने मालकी प्रकार बदलून वर्ग 2 केल्या होता. या प्रकरणात आता शेतकरी व संबंधित व्यक्ती यांचे लेखी म्हणणे सादर करता येणार आहे. महसूल प्रशासनाने सुरु केलेल्या 20 दिवसांच्या विशेष मोहीमेस आजपासुन सुरुवात होणार आहे. महसूल मंडळ निहाय हे कॅम्प होणार असून यात शेतकऱ्यांना त्यांच्याकडे असलेले लेखी व तोंडी पुरावे सादर करता येणार आहेत.10 नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी मंडळात येणारी गावे यांची सुनावणी होणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिलेल्या आदेशानुसार उस्मानाबाद व तुळजापूर तालुक्यात 10 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या दरम्यान 18 महसूली मंडळात ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यात प्रकरण निहाय दप्तर तपासणी होणार आहे यासाठी सर्व संबंधित शेतकरी व व्यक्ती यांना म्हणणे सादर करण्याची लेखी नोटीस तलाठी यांच्यामार्फत दिली जाणार असल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी डॉ योगेश खरमाटे यांनी दिली. प्रकरणनिहाय तपासणी होणार असून त्यानंतर स्वयंस्पष्ट अहवाल सक्षम अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे व निर्णय घेण्यात येणार आहे.
10 नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी मंडळात येणारी गावे तर 11 नोव्हेंबर अंबेजवळगा,14 नोव्हेंबर करजखेडा व केशेगाव,15 नोव्हेंबर पाडोळी व जागजी,16 नोव्हेंबर ढोकी, 17 नोव्हेंबर येडशी, 18 नोव्हेंबर तेर, 21 नोव्हेंबर उस्मानाबाद, 22 नोव्हेंबर उस्मानाबाद ग्रामीण मंडळात येणाऱ्या प्रकरणाची तपासणी होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर महसूल मंडळ, 24 नोव्हेंबर मंगरूळ, 25 नोव्हेंबर सावरगाव, 26 नोव्हेंबर नळदुर्ग, 27 नोव्हेंबर जळकोट, 28 नोव्हेंबर सलगरा व 29 नोव्हेंबर इटकळ या मंडळात तपासणी होणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद व तुळजापूर या 2 तालुक्यात सर्वाधिक जमीन वर्ग 2 केली आहे त्यामुळे ही मोहीम लोकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नैसर्गिक न्याय देणारी ठरणार आहे. मुळात वर्ग 1 च्या जमिनी वर्ग 2 करण्यापूर्वी शेतकरी यांचे म्हणणे ऐकून निर्णय घेणे अपेक्षित होते मात्र उशिरा का होईना ही संधी देण्यात आली आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या करोडो रुपयांच्या प्लॉटिंग जमिनी वर्ग 2 करण्यात आल्याने सर्व खरेदी विक्री व्यवहार ठप्प झाले होते तर प्लॉटिंग व्यावसायिक यांचे गुंतवणूक अडकल्याने मोठे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातील 120 गावात वक्फ बोर्डाची 8 हजार 743 एकर जमीन आहे. 8 तालुक्यात 8 हजार 670 हेक्टर म्हणजे जवळपास 21 हजार 500 एकर पेक्षा अधिक जमीन इनामी आहे. यात सर्वाधिक जमीन उस्मानाबाद तालुक्यात 3 हजार 94 हेक्टर आहे.उस्मानाबाद शहरातील देवस्थान, वकफ, वतन, सिलिंग जमिनीच्या तब्बल 375 विविध सर्वे नंबर मधील 1 हजार 303 हेक्टर म्हणजे 3 हजार 220 एकर क्षेत्रावरील जमिनीच्या नोंदी सात बारा उताऱ्यावर वर्ग 2 मध्ये घेण्यात आल्या आहेत. या जमिनीत ज्यांना अकृषी आदेश देण्यात आले आहेत त्यांचे अकृषी आदेश रद्द केले आहेत.