तुळजापूर- समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही. उद्धव ठाकरे यांना आम्ही मोठ्या भावाचे स्थान दिले त्यांनी त्यांच्या आताच्या स्थानाचा विचार करावा. मराठा आरक्षण बाबत सरकार सकारात्मक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करेल असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. त्यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.
महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेला सुखी संपन्न राहू दे, शेतीचे नुकसान होऊ देऊ नको, शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नकोस असे साकडे तुळजाभवानी चरणी घातले आहे. तुळजाभवानी मंदिर गाभाऱ्यातील 2 दगडी खांबाला तडे गेले आहेत, त्याची पाहणी केली. त्या खांबाना 4 ठिकाणी आधार दिलेला आहे, ते टेकू पर्याप्त नाहीत त्यांना आणखी सपोर्ट देण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी यांना ही बाब पुरातत्व विभागाला सांगायला लावली आहे, ते त्याचे काम करतील.
तुळजाभवानी देवीचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला असून अंगावर शहारे येतील असे दर्शन भाविकांना ही विकास कामे झाल्यावर होणार आहे. तुळजाभवानी देवी छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देतानाचे शिल्प साकारण्यात येणार असून आराखडा उत्कृष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले तर कोणताही विकासाचा निर्णय होऊ शकतो त्याच्यामुळे पैशाची अडचण येणार नाही. तुळजाभवानी देवीच्या विकासासाठी एकही पैसा कमी पडणार नाही. मोठ्या कंपनी यांना बोलवून वेळेत व लवकरात लवकर विकास आराखडा पूर्ण करू, तुळजाभवानी देवीच्या इतिहास व पवित्र्याला तडा न जाता एकही व्यक्तीच मन न दुखावता काम करणार आहोत. महसूलमंत्री म्हणून जे काही करता येईल त्याचे योगदान मी देणार असल्याचे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या स्थानाचा विचार केला पाहिजे. राजकारणात कोणीही कायमचा मित्र व शत्रू नसतो. समाजाच्या शेवटच्या माणसाच्या विकासासाठी जेव्हा ज्या बाबी समोर येतात त्या आम्ही करतो. आमच्या सोबत असताना 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मोठ्या भावाप्रमाणे स्थान दिले. एखादा निर्णय करायचा असेल तर ते उद्धव ठाकरे यांच्या घरी मातोश्रीवर जाऊन चर्चा करायचे व मातोश्रीने जे सांगितले तेच करायचे, निर्णय घ्यायचे.असे मुख्यमंत्री मी पाहिले आहेत. आम्ही एखादी गोष्ट सांगितली तर ते बाजूला ठेवायचे व उद्धव ठाकरे यांची गोष्ट ऐकायचे त्यामुळे आम्ही त्यांना प्रथम स्थानावर ठेवले असून ते प्रथम स्थानावर होते. एखादे राजकीय वक्तव्य केले असेल पण भावनिक, परिवरिक पद्धतीने त्यांचा अपमान केला नाही त्यांचे मोठ्या भावाचे स्थान कायम आहे.
मराठा आंदोलक यांनी निवेदन दिले आहे, मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबई अशी घोषणा दिली आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणसाठी सर्व काही करीत आहे, आर्थिक सामाजिक सर्वेक्षण केले आहे, समन्वय समितीने पुढाकार घेत काम केले आहे. मी आज मुख्यमंत्री यांना मराठा आंदोलकांनी दिलेले निवेदन देणार असून त्यात जो सकारात्मक मार्ग काढता येईल तो काढन्यासाठी प्रयत्न करू. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रत्येक आठवड्याला मराठा आरक्षण बाबत काय काय केले पाहिजे यावर चर्चा करीत असतात. मराठा समाजाच्या पाठीशी सरकार उभे आहे, पहिल्या पासून मराठा समाजाच्या बाजूने भुमिका घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ही भुमिका घेण्याचे काम सुरु झाले आहे, आम्ही सर्व हा प्रश्न मार्गी लावू, मुख्यमंत्री यांना मुंबई गेल्यावर जरांगे यांच्या सोबत चर्चेचा प्रस्ताव देणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.