उचलबांगडी – वादग्रस्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडेंची अखेर बदली
प्रतिनियुक्ती घोटाळा, वसुलीच्या रेटकार्डने कार्यकाळ गाजवीला – वैद्यकीय अधीक्षकपदावर नियुक्ती
धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील वादग्रस्त व भ्रष्टाचाराचे आरोप असलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांची अखेर बदली झाली आहे. गलांडे यांची लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील ग्रामीण रुगणालयाचे वैद्यकीय अधीक्षक या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे,एक प्रकारे त्यांचे डिमोशनच केले असे म्हणावे लागेल.
डॉ गलांडे यांच्याबाबत बदली, परवाना, मान्यता यासह गैरकारभाराची व रुग्ण असुविधेची तक्रार होती. डॉ गलांडे यांचे काही निर्णय हे वादग्रस्त राहिले आहेत. जिल्ह्यात प्रतिनियुक्तीसाठी ठराविक रेटकार्ड बनवत त्यांनी जोरदार वसुली केली होती. अनेक खासगी रुग्णालयात शासकीय सुविधा व योजनाची मान्यता देण्यासाठी प्रति बेड,दप्तर तपासणीसाठी एक रेटकार्ड असुन वसुलीची यंत्रणा कार्यरत केली होती. आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या कार्यकाळात डॉ गलांडे यांनी करुन दाखविले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी प्रतिनियुक्ती न देण्याबाबत लातूर आरोग्य उपसंचालक यांचे आदेश असतानाही प्रतिनियुक्तीचा बाजार मांडल्याचे समोर आले होते. उपसंचालक यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अनेक वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी प्रतिनियुक्ती दिली होती, त्याची चौकशी उपसंचालक यांच्यामार्फत सुरु आहे.
जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन बंद असणे यासह अनेक रुग्ण असुविधासह तक्रारी आहेत या सर्वबाबीमुळे त्यांचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश खुद्द पालकमंत्री डॉ सावंत यांनी दिले होते. निलंबनाचा किंवा बदलीचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे तोंडी आदेश दिले होते त्यानंतर बदली झाली असुन निलंबनाचे व चौकशीचे काय याकडे लक्ष लागले आहे.