इनाम, वकफ जमीन घोटाळा प्रकरणी कारवाईला सुरुवात – अकृषी आदेश जिल्हाधिकाऱ्याकडून रद्द
वकफ जमिनीचा अहवाल विभागीय आयुक्ताकडे सादर – भोगवटदार वर्ग 2 जमिनी रडारवर
75 % रक्कम भरावी लागणार – गुन्हे नोंद होणार, नागरिकांनो काळजी घ्या
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील इनाम, वतन, वकफ जमीन घोटाळा प्रकरणी कारवाईला सुरुवात करण्यात आली असून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे ऍक्शन मोडवर आले आहेत. इनाम, वतन जमिनीवर यापूर्वी देण्यात आलेले अकृषी आदेश हे रद्द करण्यात आले असून आता या जमिनीची खरेदी विक्री सक्षम प्राधिकारी यांच्या मंजुरीशिवाय करता येणार नाही. जिल्हाधिकारी यांनी अकृषी आदेश म्हणजे सनद रद्द केल्याने भुमाफियात तसेच बांधकाम व्यावसायिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील वकफ जमिनीचा अहवाल विभागीय आयुक्ताकडे सादर करण्यात आला असून त्यावर येत्या 10 दिवसात नेमकी काय कारवाई करायची याबाबत मार्गदर्शन व आदेश प्राप्त होतील.
नियमबाह्य पद्धतीने हजारो एकर इनामी, वतन व वकफ जमिनी भोगवटदार वर्ग 1 केल्या असून त्या सध्या महसूल विभागाच्या रडारवर असून पहिल्या टप्प्यात त्या जमिनी सातबारा उताऱ्यावर वर्ग 2 केल्या आहेत तर ज्या जमिनीवर अकृषी करण्यात आले ते आदेश रद्द करण्यास सुरुवात झाली आहे. उस्मानाबाद शहरातील सर्व्हे नंबर 175,184,186 व 327 मधील अकृषी आदेश रद्द केले आहेत तर 184/2 मधील श्रीकांत मुळे, 186/3 मधील जगदीश राजेंनिंबाळकर, 190 मधील सुरसेन दत्तात्रय राजे, बालाजी चालुक्य, सोमनाथ आमले व शामसुंदर बांगड, 186/4 मधील सुरेंद्र मालशेटवार यांना देण्यात आलेले अकृषी परवाने रद्द केले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातील 120 गावात वक्फ बोर्डाची 8 हजार 743 एकर जमीन आहे यात सर्वाधिक उस्मानाबाद तालुक्यात 2 हजार 676 एकर यात, त्यापाठोपाठ तुळजापूर तालुक्यात 2 हजार 596 एकर, परंडा 1 हजार 398,उमरगा 735, कळंब 581,भुम 493, लोहारा 139 व वाशी तालुक्यात 124 एकर जागा आहे. ही जमीन विविध दर्गा, मशीद, कब्रस्थान यासह अन्य संस्थांना विविध सेवा करण्यासाठी मुतवल्ली, मशायक, इनामदार,मुजावर,हिस्सेदार यांना सेवेसाठी देण्यात आल्या आहेत मात्र अनेक ठिकाणी खरेदी विक्री झाली आहे,याचा सविस्तर अहवाल विभागीय आयुक्त यांच्याकडे कारवाईसाठी सादर करण्यात आला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील 8 तालुक्यात 8 हजार 670 हेक्टर म्हणजे जवळपास 21 हजार 500 एकर पेक्षा अधिक जमीन इनामी आहे. यात सर्वाधिक जमीन उस्मानाबाद तालुक्यात 3 हजार 94 हेक्टर आहे तर उमरगा तालुक्यात 913 हेक्टर, भूम तालुक्यात 392 हेक्टर, तुळजापूर तालुका 1 हजार 963, वाशी 148, लोहारा 361, परंडा तालुक्यात 1 हजार 439 हेक्टर तर कळंब तालुक्यात 356 हेक्टर जमीन अशी 8 हजार 670 हेक्टर जमीन इनामी आहे.
उस्मानाबाद शहरातील देवस्थान, वकफ, वतन, सिलिंग जमिनीच्या तब्बल 375 विविध सर्वे नंबर मधील 1 हजार 303 हेक्टर म्हणजे 3 हजार 220 एकर क्षेत्रावरील जमिनीच्या नोंदी सात बारा उताऱ्यावर वर्ग 2 मध्ये घेण्यात आल्या आहेत. या जमिनीत ज्यांना अकृषी आदेश देण्यात आले आहेत त्यांचे अकृषी आदेश रद्द करण्यास सुरुवात केली आहे.
खिदमतमाश प्रकरणात भुमाफिया व अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद होणार
देवस्थान, वकफ यांना दिलेल्या खिदमतमाश म्हणजे सेवेसाठी दिलेल्या जमिनी अनेक धनदांडग्या व राजकीय नेत्यांनी तत्कालीन महसुली अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्वतःच्या नावे केल्याचे समोर आले आहे. यातील अनेक जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर आता वर्ग 2 ची नोंद करण्यात आल्याने त्याची खरेदी विक्री करता येणार नाही. यात अनेक राजकीय नेते, प्रतिष्ठीत यांच्या ताब्यातील जमिनी असून त्यावर टोले जंग इमारती व अकृषी वापर करण्यात आला आहे. खिदमतमाश जमिनीच्या शर्तभंग प्रकरणी संबंधित खरेदी विक्री करणारे व्यक्ती व त्याला मंजुरी देणारे तत्कालीन अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करण्याची कारवाई होणार आहे.
चालू बाजार मूल्यांच्या 75 % भरावे लागणार, नागरिकांनो काळजी घ्या
चालू बाजार मूल्यांच्या 50% नजराणा रक्कम व अश्या रकमेच्या 50 टक्के रक्कम दंड म्हणून भरणा केल्यास ज्या वर्ग 2 च्या जमिनीला वर्ग 1 करणे शक्य आहे त्यांना परवानगी देता येईल असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात म्हण्टले आहे. 50 टक्के नजराणा व त्याच्या 50 टक्के दंड असे चालू बाजार मूल्यच्या 75 टक्के रक्कम भरल्यास सक्षम प्राधिकारी यांची परवानगी नंतर वर्ग 1 होणार असून त्यानंतरच खरेदी विक्री करता येणार आहे.
वर्ग 2 नोंद असलेल्या जमिनीची खरेदी विक्री ही सक्षम अधिकारी यांच्या पूर्वपरवानगी शिवाय करता येत नसल्याने नागरिकांनी फसवणूक टाळण्यासाठी मूळ रेकॉर्ड पाहून व्यवहार करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी सांगणीकृत सात बारे हे आद्यवत झाले नाहीत त्यामुळे मूळ जुने रेकॉर्ड पाहणे गरजेचे आहे.