इतिहास- ज्याच्या हाती तेरणा, त्याच्या हाती सत्तेचा पाळणा
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेला तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना आगामी 25 वर्षासाठी आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ शुगरला देण्यात आल्यानंतर डॉ. सावंत यांचे जिल्ह्यातील राजकीय वजन आणखीन वाढले आहे. सावंत यांच्याकडे जिल्ह्यातील चार साखर कारखाने आल्याने त्यांचा आगामी काळात राजकारणातील दबदबा आणखीन वाढणार आहे. ज्याच्या हाती तेरणा त्यांच्या हाती सत्तेचा पाळणा असा आजवरचा इतिहास राहिला आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणासह उस्मानाबाद-कळंब मतदारसंघात डॉ. सावंत यांची भुमिका व बाजू महत्वाची ठरणार आहे. तेरणा कारखाना डॉ. सावंत यांच्याकडे गेल्यानंतर तेरणा, सत्ता केंद्र, डॉ. सावंत आणि त्यांची आगामी भुमिका काय असणार याचीच चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.
साखर कारखानदार, शिवजल क्रांतीचे प्रणेते ते उस्मानाबाद शिवसेनेचे संपर्कप्रमुख उपनेते, मंत्री, विधानपरिषद त्यानंतर विधानसभा सदस्य असा आमदार सावंत यांचा राजकीय प्रवास असून, आगामी काळात डॉ. सावंत यांना तेरणेमुळे आणखीन पाठबळ मिळणार आहे. जिल्ह्याचे राजकारणाची दिशा व दशा, आमदार, खासदार मीच ठरविणार असे सावंत नेहमी आपल्या भाषणात जाहीरपणे सांगत असतात त्यांच्या त्या भुमिकेला तेरणा साखर कारखान्यामुळे अधिक राजकीय पाठबळ मिळणार आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याप्रमाणेच डॉ. सावंत यांना तेरणा कारखाना राजकीयदृष्ट्या लाभदायक ठरणार आहे.
महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात डॉ. सावंत यांना मंत्रीपद न दिल्याने ते नाराज आहेत मध्यंतरीच्या काळात त्यांनी मातोश्री पासून सुरक्षित अंतर ठेवुन होते. महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेला 2 वर्षे होत आहेत तरीदेखील सावंत यांना मंत्रीपद दिले गेले नाही. शरद पवार यांचा डॉ. सावंत यांच्या नावाला विरोध असल्याचेही बोलले जात आहे. तसेच डॉ. सावंत यांची राष्ट्रवादी नेहमीच कोंडी करण्याचा प्रयत्न करते. डॉ. सावंत हे आगामी काळात जिल्ह्यातील राजकारणात महत्वाची भुमिका बजावू शकतात.
तेरणा स्थापन झाल्यापासून 1978 ते 2007 या 29 वर्षाच्या प्रदीर्घ काळात डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याकडे एकहाती सत्ता राहिली. विधानसभा निवडणुकीत तेरणा कारखान्याची भुमिका महत्वपुर्ण राहिली. त्यामुळे ज्याच्या हाती तेरणा त्याच्या हाती विधानसभा व राजकीय सत्ता असाच काही इतिहास बनला आहे. तेरणा कारखान्यावर चेअरमन म्हणून तुळशीराम पाटील, किसन तात्या समुद्रे, अरविंद दादा गोरे, बाळासाहेब घाडगे पाटील, सुरेश देशमुख, स्वत: डॉ. पद्मसिंह पाटील यांनी कारभार पाहिला. त्यानंतर 2007 मध्ये ओमराजें यांच्या नेतृत्वाखाली तेरणेचे सत्तापरिर्वन झाले. त्यावेळी आनंदेदेवी राजेनिंबाळकर यांनी कारभार पाहिला. तेरणा कारखान्याचे जवळपास 150 गावात 32 हजाराहून अधिक सभासद असून तेरणा सुरू झाल्यानंतर हजारों लोकांना थेट व प्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहे. त्यामुळे या भागातील आर्थिक व राजकीय चित्र बदलणार असून सावंत यांच्या थेट संबंध वाढणार आहे. आगामी काळात तेरणा साखर कारखाना व डॉ. सावंत यांची भूमिका जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा महत्वाची भुमिका बजावणार आहे. डॉ. सावंत तेरणेच्या रुपाने कोणाला राजकीय रसद पुरवितात याची चर्चा होत आहे.