उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हयात गेल्या महिनाभरात कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असताना काही लोकप्रतिनिधी यांचे मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शिवसेना नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर गायब झाले असून त्यांचे दर्शन उस्मानाबादकराना केवळ शासकीय बैठकीपुरते होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. नियोजन समितीच्या निधीच्या वाटपावरून झालेला वाद व त्यावर झालेले महाभारत सर्वश्रुत आहे. जिल्हा नियोजन बैठकीत जिल्ह्याच्या विकास निधीचे ‘आर्थिक’ नियोजन मांडून पालकमंत्री गडाख हे कोरोना संकटात गायब झाल्याचे दिसत आहे. दरम्यान पालकमंत्री यांच्याशी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उपाययोजना बाबत पालकमंत्री नेमके काय करतात हे अनेकांना माहित नाही, पहिल्या लाटेत त्यांनी लॉकडाऊन काळात अन्नधान्य कीटसह सॅनिटायझर व इतर वस्तूंचे वाटप केले होते मात्र यावेळी ते कुठे आढावा किंवा बैठक किंवा भेटी देताना दिसत नाहीत. एरव्ही फोटोसेशनची आवड असलेली काही नेते मंडळी मात्र या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संकटात दिसत नाहीत.
उस्मानाबाद जिल्ह्याला माजी मंत्री डॉ पदमसिंह पाटील , काँग्रेस नेते मधुकरराव चव्हाण व शिवसेनेचे आमदार डॉ तानाजीराव सावंत वगळता इतर पालकमंत्री हे जिल्हा बाहेरील मिळाले, आयात पालकमंत्री पैकी काहीजण तर केवळ झेंडा फडकवायला व त्यानिमित्ताने होणाऱ्या बैठकीला मुंबईहून खास सेवेत दाखल होत असल्याने त्यांचा उल्लेख उपहासाने झेंडा मंत्री असाही झाला.
उस्मानाबाद जिल्हयात सुरु असलेल्या कोरोनाच्या बिकट स्तिथीबाबत काही प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पुढाऱ्यांना काही देणेघेणे नसून मार्च एन्डच्या नियोजनात ही मंडळी व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले. आर्थिक नियोजन व नाविन्यपूर्ण उपक्रमांची संकल्पना मांडत असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या स्थितीकडे व त्यांच्या प्रतिबंधात्मक व अंमलबजावणीच्या नियोजनाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात आता कुठे दुसरी लाट सुरु झाली असून अजूनही वेळ हातात आहे मात्र त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे.
*उस्मानाबाद जिल्ह्यात खासगी रुगणलयात रेमडीसीवीर इजेक्शन तुटवडा बाबत लोकप्रतिनिधी यांच्या प्रतिक्रिया*
उस्मानाबाद जिल्ह्यात रेमडीसिवीर इंजेक्शनच्या तुटवडा बाबत आपण जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करु, कदाचित ही बाब जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत गेली नसावी, यापुढील काळात दररोज खासगी रुग्णालये व औषध दुकाने यातील उपलब्ध व वापर केलेल्या इंजेक्शन साठ्याबाबत आढावा कसा घेता येईल याकडे लक्ष देऊ असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
इंजेक्शन तुटवड्याबाबत जिल्हाधिकारी यांना बोललो असून गरज पडल्यास जिल्हा शासकीय रुग्णालयातील इंजेक्शनचा साठा तात्पुरत्या स्वरूपात खासगी रुग्णालयांना उपलब्ध करून दिला जाईल तसेच एक आठवडा पुरेल इतका इंजेक्शन व इतर औषधी साठाची मागणी व उपलब्धता बाबत जिल्हाधिकारी यांना बोलल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.
कोणत्याही स्तिथीत कोरोना रुग्णाची हेळसांड होऊ देणार नाही. अन्न व औषधें प्रशासन याच्या अधिकारी याना बोललो असून आजवर जिल्ह्यात मागणीप्रमाणे किती इजनेक्शन आले व त्याचा पुरवठा किती दुकाने व खासगी रुग्णालयांना झाला याचे ऑडिट केले जाणे गरजेचे आहे. खासगी रुगालयात साठा नसेल तर तो शासकीय रुग्णालयातून दिला जाईल असे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.