आरोग्यमंत्री डॉ सावंत यांचे दिवाळी गिफ्ट – उस्मानाबाद येथे मेडिकल कॉलेजसह 430 खाटांचे रुग्णालय मंजुरीचा अध्यादेश जारी, 15 नोव्हेंबरपासून वैद्यकिय प्रवेश प्रक्रियेस सुरूवात
उस्मानाबाद- समय सारथी
कुटुंबातील पालक ज्या पध्दतीने कुटुंबाची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे सांभाळून सनसमारंभास कुटुंबाला भेट देतात त्याप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ तानाजीराव सावंत यांनी जिल्ह्यास चालू शैक्षणिक वर्ष सन 2023-2024 या वर्षासाठी 100 विद्यार्थ्याेंना वैद्यकिय प्रवेश तसेच 430 खाटांचेे जिल्हा रुग्णालय मंजुर केले. मागासलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकास, उन्नती, प्रगतीसाठी वैद्यकीय महाविद्यालय तसेच 430 खाटांचे रुग्णालय हा एक मैलाचा दगड ठरणार आहे. पाच टप्प्यात 902 कोटी रुपयांच्या मान्यतेचा राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने अध्यादेश जारी केला असून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने उस्मानाबाद जिल्ह्यासाठी हे गिफ्ट आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या माध्यमातून दिले आहे.
पाच टप्प्यात हे वैद्यकीय महाविद्यालय पूर्ण होणार असून आरेाग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. सावंत यांनी सातत्याने याचा पाठपुरावा करताना केंद्र सरकार तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठका घेऊन चालू शैक्षणिक वर्षात वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेकरिता यशस्वी प्रयत्न केले. जिल्हास्तरावर देखील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पायाभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या मागणीनुसार वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वतंत्र लेखाशिर्षला मान्यता दिली यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाकरिता लागणारी साधनसामुग्री खरेदी तसेच इतर बाबी करिता येणार्या अडचणी दूर होऊन महाविद्यालयास रुग्णालयाचे कामकाज अधिक गतीने सुरू होत आहे. यामुळे यावर्षी पासूनच उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी अर्थात भावी डॉक्टर, वैद्यकीय अधिकार्यांच्या रेलचेलने उस्मानाबादचा परिसर फुलणार आहे.
पायाभूत सुविधांसह मानव संसाधन तसेच अत्यावश्यक बाबी ह्या करिता पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारने 189 कोटी तर राज्य सरकारने 142 कोटटी रुपयांची तरतूद केली असल्याचे अधिष्ठाता डॉ. राठोड यांनी सांगून आरोग्यमंत्री सावंत यांच्या प्रयत्नातून हे शक्य झाले असे यावेळी सांगितले. येत्या 15 नोव्हेंबरपासून प्रवेश प्रक्रियेस सुरूवात करणार असून, विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद जिल्ह्याचा मागासलेपणा या माध्यमातून निश्चित कमी होणार असून, दिवाळीचे बंपर गिफ्ट या निमित्ताने आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री सावंत यांनी जिल्ह्यास दिल्याने जिल्हावासियांकडून त्यांचे आभार व्यक्त होत आहेत.