आरक्षणाचा आवाज घुमणार – परंडा शहरात 8 नोव्हेंबरला मराठा आरक्षण मोर्चा, ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी
उस्मानाबाद – समय सारथी
कळंब येथील आरक्षण मोर्चानंतर आता परंडा शहरात आरक्षणाच्या मागणीचा आवाज घुमणार आहे. परंडा शहरात 8 नोव्हेंबरला मराठा आरक्षण मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची प्रमुख मागणी असणार आहे. परंडा येथे झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे त्याअनुषंगाने तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. नो आरक्षण, नो व्होट असा नारा देण्यात आला आहे. हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्ष, संघटना, समाजाच्या समर्थनात किंवा विरोधात नाही अशी भूमिका सकल मराठा समाजाने जाहीर केली आहे.
2 दिवसांचे विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी मराठा समाजाने केली असून जोपर्यंत आरक्षण दिले जाणार नाही तो पर्यंत मतदान करणार नाही ( नो आरक्षण, नो व्होट ) असा संकल्प केला आहे त्यामुळे हा लढा आता अधिक तीव्र होत आहे. जातीचा नसलो तरी या मातीचा आहे असे म्हणत कळंब येथील 19 सप्टेंबर रोजीच्या मराठा आरक्षण मोर्चाला मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला होता त्यानंतर आता परंडा शहरात 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता आठवडा बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून कोठला मैदान येथे मोर्चा जाणार आहे त्यात लहान मुली प्रतिनिधिक स्वरूपात भाषण करीत भूमिका मांडतील व त्यानंतर मागण्याचे निवेदन प्रशासनाला दिले जाणार आहे. 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता परंडा शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात नियोजनाची बैठक होणार आहे. यात वेगवेगळ्या नियोजन समिती गठीत करण्यात येणार आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील मराठा आरक्षण मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, भर पावसात सुद्धा मराठा बांधव लाखोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते त्यानंतर आता हा लढा वाढत आहे. सरकारने अद्याप आरक्षणबाबत ओबीसी की इतर घटकातून याची कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. आरक्षण विषयावर दिशा ठरविण्यासाठी सरकारने मंत्रीमंडळाची उपसामिती गठीत केली आहे.