आयपीएस कुमावत यांचा धसका – उस्मानाबादच्या कारवाईचा काय अहवाल देणार ? मोठे मासे गळाला लागणार का ?
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद शहरात अवैध धंद्यावर छापा टाकणारे बीडचे सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचा धसका अवैध धंदे करणाऱ्यांनी घेतला आहे कारण त्यांच्या बीड येथे धडक कारवाईने राज्यभर खळबळ माजवली आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक के एम् मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या आदेशाने विशेष पथकाची कारवाईला सुरुवात झाली आहे. उस्मानाबाद येथे विशेष कारवाई करण्यासाठी त्यांना पाठविण्यात आल्याने ते नेमका काय अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षक यांना देतात याकडे लक्ष लागले आहे. या कारवाईत काही दलाल एजन्ट यांना पकडण्यात आले असले तरी त्यांचे नेटवर्क चालविणाऱ्या मोहरक्याना पोलीस पकडणार का ? यासह अन्य बाबीकडे लक्ष लागले आहे.
कुमावत हे पोलीस सहायक पोलीस अधीक्षक असून ते आयपीएस अधिकारी आहेत. बीड येथील अवैध धंदे करणाऱ्याच्या त्यांनी कारवाई करून चांगल्याच मुस्क्या आवळल्या आहेत. अवैध बायो डिझेल रॅकेट प्रकरणी त्यांनी शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष कुंडलिक खाडे यांच्यावर कारवाई केल्याने त्यांना पक्षातून हकालपट्टी केली होती तर पत्याच्या क्लब व अवैध जुगार प्रकरणात त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यावर कारवाई केली. बीड येथील वकफ़ देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणी नेमण्यात आलेल्या एसआयटीच्या प्रमुख पदी कुमावत यांची निवड करण्यात आली आहे. दारू, जुगार, वाळू, बायो डिझेल यासह अनेक अवैध धंद्यावर त्यांनी स्वतः जाऊन छापा टाकल्याने त्यांची बीड जिल्ह्यात अवैध धंदेवाल्यात चांगलीच धास्ती आहे. बीड येथे रुजू झाल्यावर त्यांनी स्वतःचा नंबर सार्वजनिक करीत थेट तक्रार करण्याचे जनतेला आवाहन केले आणी त्यातून मिळणाऱ्या माहितीतून कारवाईचे सत्र राबविले.राजस्थानमधील झुंझुनूचे रहिवासी असलेले पंकज कुमावत हे 2014 साली आयआयटीमधील अभियांत्रिकीची पदवी धारक असून त्यांनी पहिल्या प्रयत्नात 2019 सालच्या परीक्षेत यश मिळविले त्यांना भारतीय पोलिस सेवेतील महाराष्ट्र केडर मिळाले आहे.