आधी संचालकांचा सत्कार नंतर केली मारहाण – परंडा बाजार समिती राजकारणातील प्रकार
सुरेश कांबळे यांचा फोटो व्हायरल – चर्चेला उधाण
धाराशिव – समय सारथी
परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सभापती उपसभापती निवडीच्या राजकारणावरून वातावरण चांगलेच तापले आहे.
महाविकास आघाडीचे काही संचालक व त्याचे नातेवाईक यांच्या अपहरण, मारहाण प्रकरणी मंत्री डॉ तानाजी सावंत गटाचे सुरेश कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असुन त्यांना अटककरुन पोलिस कोठडी दिली आहे. या थरारक घडामोडी नंतर परंडा येथील सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच चर्चेत आला आहे.
अपहरण मारहाण गुन्ह्यातील फरार आरोपी सुरेश कांबळे यांनी गेल्या वीस एक दिवसापूर्वी निवडून आलेल्या विरोधी पक्षाच्या नूतन संचालकांचा सत्कार केला होता त्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्याच संचालक व नातेवाईक यांना कांबळे यांनी मारहाण केली. ज्यांचा आधी सत्कार केला नंतर त्यांनाच मारहाण केली अशी चर्चा होत आहे.
कांबळे यांची पोस्ट
निवडणूक म्हणलं की हार-जित आलीच परंतु निवडणूक झाल्यानंतर राजकीय मतभेद बाजूला ठेऊन विकासाच राजकारण करणं गरजेचं असतं. गेल्या काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षातीलही नव्याने संचालक झालेल्या विजयी उमेदवारांचा सत्कार मी करणार असल्याचं जाहीर केलं होतं.त्यानुसार परंडा बाजार समितीमध्ये नव्याने संचालक झालेल्या शंकर जाधव व किरण शिंदे यांचा त्यांचे वडील संचालक झाल्याबद्दल सन्मान केला. शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेला आपल्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीत न्याय मिळावा अशी यावेळी अपेक्षा व्यक्त करीत कांबळे यांनी सत्कार करुन फोटो सोशल मीडियावर टाकले. आता तेच फोटो टिकात्मकरित्या व्हायरल होत आहेत.