आधारभुत धान्य खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लुट , 3 वर्षांपासून घोटाळेबाज मोकाट
पुन्हा एकदा चौकशी समिती – लोहारा तालुक्यातील प्रकार , पाठबळ कोणाचे ?
शेतकऱ्यांची 1 कोटी 73 लाखांची लुट, गुन्हे नोंद करून रक्कम वसुली करा
उस्मानाबाद – समय सारथी
लोहारा तालुक्यातील नागूर येथील यशवंतराव चव्हाण कृषी उत्पादने व विकास सहकारी संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या आधारभुत धान्य खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची 1 कोटी 73 लाख रुपयांची लुट झाल्यासह अन्य गांभीर बाबींचा चौकशी अहवाल लोहारा येथील तत्कालीन सहाय्यक निबंधकांनी 26 जुन 2018 रोजी दिला मात्र गेली 3 वर्षांपासून घोटाळेबाज मोकाट आहेत. चौकशी अहवालात अनेक बाबी स्पष्ट झालेल्या असताना पुन्हा त्याच मुद्यांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय नवीन चौकशी समिती नेमली आहे. या घोटाळेबाजांना पाठबळ कोणाचे ? हा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे, विशेष म्हणजे तत्कालीन पालकमंत्री यांनी या प्रकरणात आढावा बैठकीत कारवाईच्या सूचना दिल्या होत्या तरी देखील कारवाई झाली नसून कागदोपत्री पत्रव्यवहार सुरूच आहे. दिनकरराव जावळे पाटील फूड प्रोड्युसर कंपनी व संचालकांवर गांभीर आरोप करण्यात आले आहेत.दोषीवर फौजदारी कारवाई करून रक्कम वसुली करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
नागूर येथील यशवंतराव चव्हाण संस्थे मार्फत चालविण्यात येत असलेल्या शासन हमीभाव खरेदी केंद्रामार्फत सन 2016-17 ते 2020-21 या काळात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार मनोज पाटील व इतरांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली होती त्यानुसार जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी तीन सदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे. परंडा येथील सहायक निबंधक एस पी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीत तुळजापुर येथील सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी पी आर कुलकर्णी व उमरगा येथील लेखापरिक्षक शेख एम सी यांचा समावेश असणार आहे. यशवंतराव चव्हाण व दिनकरराव जावळे पाटील फूड प्रोड्युसर या दोन्ही संस्थेच्या कारभाराची चौकशी करून तपासणी अहवाल 20 दिवसात सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक यांनी दिले आहेत.
शिवसेनेचे लोहारा शहर प्रमुख शेख सलीम जिलानी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी नागूर येथील आधारभूत खरेदी केंद्राची तक्रार केली होती त्यात 26 जुन 2018 रोजी चौकशी अहवाल कारवाईसाठी सादर करण्यात आला होता. चौकशी अहवालनुसार संस्था व दिनकरराव जावळे पाटील यांनी 2016 ते 2018 या काळात 1 लाख 8 हजार 198 क्विंटल धान्य खरेदी करून 160 रुपये प्रती क्विंटल दराने पावत्या लावून शेतकऱ्यांची 1 कोटी 73 लाख 11 हजार 710 रुपयांची लुबाडणूक केली.
दिनकर जावळे पाटील यांनी लोहारा बाजार समिती संचालक पदाचा गैरवापर केला. एकच नंबर वरून अनेक शेतकऱ्यांच्या नोंदी करून व्यापाऱ्यांचा शेतीमाल खरेदी केला. शेतकऱ्यांचे प्रतिज्ञापत्र घेतले नाही, धान्य खरेदी केलेला शेतीमाल साठवणुकीची कोणतीही परवानगी नसताना साठवणूक करित 75 हजार गोडाऊन भाडे उचलले. कार्यक्षेत्र सोडून बाहेरील जिल्ह्यातील माल खरेदी केला, नाफेडच्या नियमांचे उल्लंघन केले, एकच घरातील व्यक्ती दोन्ही संस्थेत संचालक म्हणून घेतले यासह 16 मुद्यावर गांभीर आरोप केले.
2018 मध्ये धान्य खरेदी केंद्रात अनियमितता दिसून आल्याचे समोर आले तरी कारवाई मात्र शून्य आहे. 2018 च्या अहवालावर काय कारवाई केली याची माहिती द्यावी यासाठी पणन विभागाच्या सहसंचालक नीलिमा गायकवाड यांनी कार्यकारी संचालक व जिल्हा उपनिबंधक यांना पत्र दिले आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.