धाराशिव – समय सारथी
आत्महत्या प्रकरणात दाखल गुन्ह्यात फरार आरोपी सुरेश कांबळे यांचा अटकपुर्व जामीन अर्जावर भुम येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली असुन 3 जुलैला कोर्ट त्यावर निकाल देणार आहे. कांबळे यांच्यासह अन्य आरोपीवर 21 जुन 2023 रोजी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा भुम पोलिस ठाण्यात नोंद झाला असुन ते तेव्हापासुन फरार आहेत. पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी व सरकारी वकील ऍड किरण कोळपे यांनी बाजु मांडत जामिनीला विविध मुद्यावर विरोध केला. या गुन्ह्यात पोलिसांनी तपास करुन दोषारोप पत्र दाखल केले आहे, पुरवणी दोषारोप पत्राची तरतूद राखीव ठेवली आहे. तरुणाने आत्महत्या करण्यापुर्वी व्हिडीओ केला होता, कांबळे यांनी सर्वोच्च न्यायालयांच्या आदेशाचे केलेले उल्लंघन, कांबळे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी व गुन्ह्याचे स्वरूप हे मुद्दे मांडण्यात आले आहेत.
भुम येथील 30 वर्षीय फय्याज दाऊद पठाण या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात बार्शी येथील डॉ नंदकुमार स्वामी,अर्चना स्वामी,यश स्वामी व सुरेश कांबळे यांच्या मानसिक जाच व मारहाणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सांगितल्याने कलम 306,323,504,506 व 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आत्महत्या केल्यावर माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. कांबळे सारखे गुंड जर म्हणत असतील पोलीस माझे काही करू शकत नाहीत तर मग तुम्ही पोलीस चौकीला मोठे कुलपे लावा. तुमची काही गरज नाही, माझा मृतदेह तेव्हाच कुटुंबाच्या ताब्यात द्या जेव्हा सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात जेलमध्ये असतील. माझ्या मृतदेहाला मुंग्या लागल्या तरी चालेल मात्र तो देऊ नका अशी कळकळीची विनंती विडिओमध्ये करीत फय्याज यांनी आत्महत्या केली होती.
आत्महत्याच्या गुन्ह्यात कांबळे यांना अटकपुर्व जामीन देण्यासाठी कोणताही ठोस आधार वाटत नाही, त्यामुळे त्यांना दिलेला तात्पुरता जामीन रद्द करण्यात येतो व त्यांना भुम येथील कोर्टात 15 मार्च 2024 पुर्वी शरण (सरेंडर) होण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाच्या 2 न्यायमुर्तीच्या खंडपीठाने दिले होते. न्यायमुर्ती एम एम सुंद्रेश व एसव्हीएन भट्टी यांनी हे आदेश दिले आहेत मात्र कांबळे हे शरण आले नाहीत त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान केला होता यासह अन्य मुद्दे भुम कोर्टात मांडण्यात आले.