आत्मदहनाचा इशारा – खासगी सावकाराच्या जाचाला कुटुंब कंटाळले, अनेक वर्षांपासून लढा
जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्हा उपनिबंधकांनी लक्ष देणे गरजेचे
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील बाबळसूर येथील सूर्यवंशी कुटुंब हे खासगी सावकाराच्या जाचाला वैतागले असून त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. बाबळसूर येथील खासगी सावकार किसन गोविंद मुगळे, जीवन रंगराव सुर्यवंशी यांच्यासह अन्य लोकांविरुद्ध सुर्यवंशी कुटुंबाने तक्रार देवूनही न्याय मिळत नसल्याने त्यांनी वैतागून आत्मदहनाचा इशारा दिला आहे. व्याजाने घेतलेले पैसे परत देवूनही जमीन खरेदी करून मिळत नाही. सुर्यवंशी कुटुंबाकडे या जमिनीचा ताबा व वहिवाट असल्याने ताबा सोडवा यासाठी त्यांना रात्री अपरात्री शेतात जाऊन धमक्या आणि मारहाण केली जात असल्याने हे कुटुंब दहशतीखाली आहे.जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्हा उपनिबंधकांनी यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. 2012 पासून हे कुटुंब विविध प्रशासकीय पातळीवर कायदेशीर लढा देत आहे.
बाबळसूर येथील बालाजी शेषराव सुर्यवंशी व शेषराव अर्जुन सुर्यवंशी यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार किसन मुगळे, जीवन सुर्यवंशी यांनी संगंमताने त्यांची जमीन खासगी सावकारकीत घेतली. बालाजी सुर्यवंशी यांना त्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैशांची आर्थिक गरज असल्याने त्यांनी किसन मुगळे यांच्याकडून 3 लाख रुपये दामदुप्पट देण्याच्या अटीवर खासगी सावकारी पद्धतीने घेतले व त्या बदल्यात बालाजी सुर्यवंशी यांनी बाबळसूर येथील गट नंबर 40 मधील 1 हेक्टर 20 आर व 2 हेक्टर 29 आर इतके क्षेत्र मुगळे यांना लिहून दिले. मुगळे यांचे कर्ज फेडण्यासाठी सुर्यवंशी यांनी जीवन सुर्यवंशी यांच्याकडून कर्ज घेतले व ते फेडले तरी देखील सदरील जमीन ही सुर्यवंशी यांना परत दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. या खरेदी व्यवहारातील साक्षीदार व इतर गावकरी यांना हा व्यवहार खासगी सावकारकीतुन झाला असल्याची माहिती आहे.
सदरील लोकांनी सुर्यवंशी प्रमाणे इतर लोकांची फसवणूक केल्याची तक्रार दिली असून त्यांनी केलेल्या खरेदी खताची माहिती पुरावा म्हणून तक्रारी सोबत जोडली आहे. 3 लाख रुपयांच्या मुद्दलच्या बदल्यात व्याजासह 92 लाख रुपये मागत असून ते दिले तरच जमीन परत देऊ असे धमकावत आहेत. 2012 पासून विविध पातळीवर हे कुटुंब तक्रारी करित आहे मात्र त्यांना न्याय मिळत नसल्याने अखेर त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
खासगी सावकारकी तक्रारीत जमिनीचा ताबा महत्वाचा असतो. शेतकऱ्यांना अनेक वेळा पैशांची गरज असल्याने ते खासगी सावकार यांच्याकडून व्याजाने पैसे घेतात त्याबद्दल्यात स्वतःची जमीन गहाणखत किंवा कायम खरेदी करून देतात. अनेक वेळा सावकार हा जमिनीची कागदोपत्री खरेदी करतो मात्र जमिनीचा प्रत्यक्ष ताबा हा शेतकऱ्याकडे असतो, तो शेतकरी ही जमीन कसत असतो. सावकारकीच्या तक्रारी प्रकरणात जमिनीचा ताबा कोणाकडे आहे? कोण जमीन कसतो यासह शेजारील शेतकरी यांचे जबाब व प्रत्यक्ष घटनास्थळ पंचनामा हा महत्वाचा ठरतो.