आढावा बैठकीला खासदार व इतर आमदारांची दांडी – शिवसेनेचा हल्लाबोल, कळवळा व पुळका केवळ चमकोगिरीसाठी
पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांची राजकीय धास्ती – कोनशीला प्रकरणाची तक्रार अमित शहांच्या दरबारात, राजीनामे देण्याची मागणी
धाराशिव – समय सारथी
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या आढावा बैठकीला सत्ताधारी भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील, ज्ञानराज चौगुले यांच्यासह खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी जाणीवपूर्वक शासकीय निमंत्रण असतानाही दांडी मारली या मुद्यावर शिवसेनेचा शिंदे गट आक्रमक झाला आहे. आढावा बैठकीचे प्रशासकीय निमंत्रण दिल्याचा दावा शिवसेना पदाधिकारी यांनी करीत आरोप केले आहेत. खासदार व आमदार हे अमर अकबर ऍंथोनी असल्याचा आरोप केला.
सर्व आमदार व खासदार हे जाहीर भाषणात जनतेचा कळवला व पुळका असल्याचे दाखवतात आणि आढावा बैठकीत उपस्थितीत राहून जनतेचे प्रश्न, विकासाचे मुद्दे मांडत नाहीत त्यामुळे हा मात सगळे नाटक केवळ चमकोगिरीसाठी आहे. लोकांनी आमदार खासदार यांना निवडून दिले आहे त्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार जनतेला आहे त्यामुळे आढावा बैठकीला हजर का राहिले याचे उत्तर द्यावे अन्यथा पदाचे राजीनामे द्यावे अशी मागणी केली.
पत्रकार परिषदेला सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंके, सुरज साळुंके, तालुका प्रमुख अजित लाकाळ उपस्थितीत होते.
रेल्वे भूमिपूजन कोनशीलेवर शेजारील बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत याचे नाव होते मात्र पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे नाव आमदार म्हणून सुद्धा नव्हते, एक प्रकारे डॉ सावंत यांचे राजकीय अस्तित्व अमान्य करण्याचा हा प्रकार होता. कार्यक्रमाला गालबोट नको म्हणून आम्ही शांत होतो मात्र याची दखल मंत्री सावंत यांनी घेतली असुन पुणे येथील अमित शहा यांच्या भेटीत याची तक्रार व चर्चा झाली असेल अशी माहिती अनिल खोचरे यांनी दिली.
ग्रामपंचायत निवडणूक निवडून यायची यांची लायकी नव्हती व ते निवडून आलेही नसते मात्र डॉ तानाजीराव सावंत यांनी आमदारकी खासदारकी दिली असे सांगितले.
शेतकरी,विकास, प्रलंबित प्रश्न यांचा पुळका व कळवळा दाखविणारे खासदार, आमदार लोकप्रतिनिधी अनुपस्थित का ? पदे हे चमकोगिरी करण्यासाठी आहेत. आम्हाला निधी व हे मिळाले नाही असे म्हणत सावंत यांच्या नावाने बोंब मारणे हा उद्योग सुरु आहे. कदाचित अधिकारी यांना भिऊन हे आले नाहीत, अधिकारी व त्यांचे साटेलोटे असू शकते व त्याची पोलखोल बैठकीत होईल असा आरोप केला. डॉ सावंत हे निष्कलंक पालकमंत्री असुन अधिकारी सोबत उघडे पडतील म्हणून तर खासदार आमदार आले नसतील का ? असा आरोप केला. विकासाला कोण खिळ घालताय हे तर कळू द्या, पत्रकार यांच्या समोर एकदा चर्चा होऊ द्या.
सावंत हे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी उमरगा, लोहारा, तुळजापूर या तालुक्यात जनता दरबार, आढावा बैठका घेतली नाही यावर बोलताना म्हणाले की येत्या महिन्यात या बैठका घेतल्या जातील.
डॉ सावंत यांच्या राजकीय घोडदौडमुळे सावंत यांची भीती आहे. राजकीय अस्तित्वाची भीती आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी आढावा बैठकीला पाठ फिरवीत आहेत. आम्ही विकासासाठी 14 कोटी आणले आता आमचे अभिनंदन करणार का ? केवळ निषेध व पोकळ आरोप करुन विकास होत नसतो असा आरोप केला.