आज कोर्टात सुनावणी – अरविंद नागरी पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणाकडे ठेवीदारांचे लक्ष
पिग्मीच्या रकमेसह मुदत ठेवीचे पैसे अडकले, रक्कम कोटींच्या घरात – कोर्टात 50 टक्के रक्कम भरण्याची दंडनाईक यांची तयारी
धाराशिव – समय सारथी
अरविंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या फसवणूक प्रकरणात आज गुरुवारी धाराशिव कोर्टात सुनावणी होणार असुन सुनावणीकडे ठेवीदार, गुंतवणूकदार यांचे लक्ष लागले आहे. अरविंद पतसंस्थाने अनेक ठेवीदार यांना ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून गंडा घातला आहे त्यात ठेवीदार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
गोरगरीब लोकांनी रोज पै पै भरलेल्या पिग्मीच्या रकमेसह मुदत ठेवीची रक्कम मुदत संपली तरी अनेक ठेवीदार यांना गेली 7 ते 10 वर्षांपासुन दिल्या नाहीत. पोलिसात गुन्हा नोंद होताच अटकेच्या भीतीने दंडनाईक यांनी ठेवीदार यांच्या रकमेच्या 50 टक्के पैसे भरण्याची तयारी दाखविल्याने चेअरमन रोहितराज दंडनाईक यांना कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत तात्पुरता दिलासा दिला आहे. या प्रकरणात ऍड मिलींद पाटील, ऍड अमोल वरुडकर आरोपीच्या वतीने काम पाहत आहेत.
अरविंद बँकेचे चेअरमन रोहितराज विजयकुमार दंडनाईक यांच्यासह संचालक मंडळावर तीन ठेवीदाराची 10 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी कलम 420, 406, 409,120 ब व महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हीतसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 मधील कलम 3 व 4 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
फसवणूकीचे हे प्रकरण केवळ 3 तक्रारदार यांच्या पुरते मर्यादित नसुन अनेक ठेवीदार यांची मुदत ठेवीचे पिग्मीचे पैसे दिलेले नाहीत त्यामुळे त्यांनी समोर येऊन पोलिसांत किंवा कोर्टात तक्रार देण्याची गरज आहे. काही ठेवीदार समोर आले असुन फसवणूकीचा हा आकडा काही कोटींच्या घरात गेला आहे.
अरविंद पतसंस्थेच्या लेखापरिक्षण अहवालात गंभीर बाबी व दोष दिसून आल्याने सहकार विभागाने कलम ८८ नुसार या पतसंस्थेची चौकशी प्रस्तावित केली आहे. सहाय्यक निबंधक डॉ. अंबिलपुरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. पतसंस्था स्थापन झालेल्या तारखेपासून संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार तपासले जाणार आहेत त्यानंतर अनेक बाबी समोर येणार आहेत.
वसंतदादा बँकेचे फरार आरोपी पोलिसांना सापडेनात
वसंतदादा बँकेने ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी धाराशिव येथील शहर पोलीस ठाण्यात २७ जुलै रोजी तत्कालिन चेअरमन विजय दंडनाईक, तत्कालिन व्यवस्थापक दीपक देवकते, तत्कालिन संचालक मंडळ यांच्या विरोधात विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपींचा अटकपुर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला असुन संभाजीनगर उच्च न्यायालयात त्यांच्या अटकपुर्व जमिनीवर 13 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.एक महिना उलटून गेला तरी एकही आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.