“आकांक्षित जिल्हा” या कार्यक्रमांतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याची राज्याकडून दखल
जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांची प्रशंसा, अतिरिक्त 3 कोटींचा निधी
धाराशिव – समय सारथी
आकांक्षित जिल्हा कार्यक्रम अंतर्गत नोव्हेंबर-२०२२ या कालावधीतील उस्मानाबाद जिल्ह्याकडून शैक्षणिक क्षेत्रात करण्यात आलेल्या कामगिरीबाबत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना अवर सचिव सुनिल शिंदे आणि अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा यांच्याकडून प्रशस्ती पत्र व शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. जिल्ह्याला 3 कोटी रुपयांचा शिक्षणासाठी निधी देखील मिळाला आहे.
नीति आयोगाकडून आकांक्षित जिल्हा कार्यक्रम अंतर्गत “स्पर्धात्मक पध्दतीद्वारे” अव्वल क्रमांक प्राप्त करणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यास 3 कोटी इतका “अतिरिक्त निधी” वाटप करण्यात आला.
नवी दिल्ली येथील नीति आयोगाचे मिशन डायरेक्टर यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात असे अवगत केले आहे की, “आकांक्षित जिल्हा कार्यक्रम” अंतर्गत नोव्हेंबर-२०२२ महिन्यातील कामगिरीच्या आधारे उस्मानाबाद जिल्ह्याने “शैक्षणिक क्षेत्रात ” अव्वल स्थान मिळविले आहे आणि त्यासाठी 3 कोटी “अतिरिक्त निधी मिळण्यास उस्मानाबाद जिल्हा पात्र ठरला आहे. त्याबद्दल मी जिल्हा प्रशासनाच्या कामगिरीचे मनःपूर्वक अभिनंदन करतो व आपल्या जिल्हयास पुढील काळात देखील “आकांक्षित जिल्हा कार्यक्रम ” अंतर्गत आपल्या नेतृत्वाखाली आणखी यश मिळावे, याकरिता शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांच्या उपरोक्त कामगिरीची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात घेण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी सूचनाही निवासी उपजिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे.