आई तुळजाभवानीचे प्राचीन मंकावती तीर्थकुंड हडप , गुन्हे नोंद करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश
उस्मानाबाद – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील प्राचीन महात्म्य असलेला मंकावती तिर्थकुंड हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. चौकशी समितीच्या अहवालानंतर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश दिले आहेत. तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण , तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे.विष्णुभक्त श्री गौतम यांनी तुळजापूर येथे आल्यावर तो बांधल्याचा दाखला इतिहासात मिळतो मात्र भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी बनवेगिरी व कागदपत्रात फेरफार करीत मालकी दाखवली असून यावर अवैध बांधकाम केले आहे. या कुंडाची सरकारच्या नावे कागदपत्रेमध्ये बदल व नोंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
भाजप स्थानिक नेते देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांनी हा प्रताप करीत थेट तिर्थकुंडच हडप करीत अनेक ठिकाणी केली बांधकाम करून मोडतोड केली आहे.भाजप नेते देवानंद रोचकरी हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत.खुद्द जिल्हाधिकारी कौस्तुभ यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली होती. तुळजापूर तीर्थक्षेत्रात घोटाळेबाज यांची हिम्मत वाढतेय असुन जमीन, सिंहासन दानपेटीतील सोने चांदी, तीर्थक्षेत्र अनुदान घोटाळ्यानंतर आता थेट ऐतिहासिक प्राचीन वास्तूवर डल्ला मारला गेल्याचे समोर आले आहे.तुळजापूर येथील प्राचीन वास्तू कोणत्या व त्यावर कोणाचा ताबा आहे ही माहिती समोर येणे गरजेचे असून सरकारने व तुळजाभवानी मंदिर संस्थानने प्राचीन कुंडाना संरक्षीत मंदिरे व धार्मिक स्थळांचा दर्जा देऊन त्यांचे जतन केले पाहिजे. तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांच्यानंतर कौस्तुभ दिवेगावकर यांच्या रूपाने प्रदीर्घ काळानंतर एखाद्या जिल्हाधिकारीने भूमाफिया विरोधात कारवाईचे धाडस केले आहे.
गरीबनाथ दशअवतार मठाचे महंत सावजी महाराज, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष तथा मनसेचे जिल्हा संघटक अमर राजे कदम व इतरांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांना 31 मे 21 रोजी लेखी तक्रार करून तुळजापूर शहरातील प्राचीन श्री विष्णू तीर्थ (सध्या मंकावती कुंड नावाने प्रचलित) बेकायदेशीर काम करणाऱ्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे,नगर परिषद मुख्याधिकारी आशिष लोकरे व भूमी अभिलेख कार्यालयाच्या उप अधीक्षक वैशाली गवई यांच्या त्रिसदस्यीय चौकशी समितीची नेमणूक केली होती या समितीने केलेल्या अहवालांनंतर जिल्हाधिकारी यांनी फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. तुळजापूर येथे कारवाईचे अनेक आदेश निघतात मात्र ते लालफितीच्या कारभारात व राजकीय दबावाखाली दडून राहतात असा आजवरचा अनुभव अनेक प्रकरणात आहे मात्र थेट प्राचीन तिर्थकुंड प्रकरणात विनाविलंब आदेशाची अमलबाजवणी व्हावी ही माफक अपेक्षा आहे.
मंकावती या भव्य तीर्थकुंडाची मालमत्ता ही नगर परिषद मालकीची कागदपत्रांची पाहणी करून स्पष्ट झाले आहे. तुळजापूर नगर परिषद यांनी 12 नोव्हेंबर 1982 रोजी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र लिहून मंकावती कुंड तुळजापूर नगर परिषदेच्या स्थापनेपूर्वी तुळजापूर लोकल फंडकडे व्यवस्थापन होते. तत्कालीन हैद्राबाद संस्थान शासनाने मंकावती कुंड लोकल फंडास व्यवस्थापनासाठी सोपविले होते त्यामुळे या कुंडाची मालकी नगर परिषदेची आहे.मंकावती कुंडाच्या बनावट कागदपत्रे व पुरावे तयार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावे तसेच पुरातत्व संवर्धन कायदा 1904 मधील तरतुदीच्या अनुषंगाने कार्यवाही करावी असे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी आदेशीत केले आहे. हे तिर्थकुंड अतिक्रमण मुक्त करून त्याचे जतन होणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे भाजपचे असून तुळजापूर नगर परिषदेवर भाजपची सत्ता आहे. भाजप नेहमी हिंदुत्व रक्षणाचा नारा देते मात्र त्यांच्याच्या पक्षाच्या नेत्याने पुरातन तिर्थकुंड हडप केले आहे.या प्रकरणात भाजपच्या अधिकृत भूमिकेकडे तुळजापूरकर व भाविकांचे लक्ष लागले आहे