आत्महत्या प्रकरणात सुरेश कांबळे यांचा अटकपुर्व जामीन नाकारला – संपत्ती जप्तीची मागणी
धाराशिव – समय सारथी
भुम येथील फय्याज पठाण आत्महत्या प्रकरणात फरार आरोपी सुरेश कांबळे यांचा अटकपुर्व जामीन अर्ज भुम येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे, हा जामीन फेटाळताना कोर्टाने अनेक निरीक्षण नोंदविली आहेत. आजवर कांबळे यांचा 2 वेळेस अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असुन ते गेली वर्षभरापासुन फरार आहेत. त्यामुळे त्यांना पोलिस कधी अटक करणार हे पाहावे लागेल. कांबळे यांना फरार घोषित करुन संपत्ती जप्तीची कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
आरोपी सुरेश कांबळे यांच्या विरोधात अनेक पुरावे दोषारोप पत्रात आहेत, आत्महत्या करण्यापुर्वी पठाण यांनी व्हिडिओ क्लिप केली असुन त्यात त्यांच्यावर झालेला अन्याय, दबाव व घटनाक्रम नमुद केला आहे. कांबळे यांनी 35 लाखांच्या वसुलीसाठी पठाण व त्याच्या कुटुंबावर दबाव टाकला, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी यामुळे भुम कोर्टाने जामीन नाकारला. पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी व सरकारी वकील ऍड किरण कोळपे यांनी मांडलेली बाजु महत्वाची ठरली.
फय्याजच्या आईने पुरवणी जबाब देत असताना सुरेश कांबळे यांच्यासह 2 आरोपींचा या घटनेशी संबंध नसल्याचा जबाब देत त्यांची नावे आरोपी यादीतून वगळावी असे सांगितले मात्र फय्याजच्या वडिलांचा जबाब कायम आहे, ते भुमिकेवर ठाम आहेत. कांबळे यांच्यासह इतर आरोपी हे स्थानिक असुन त्यांच्यापासुन जीविताला धोका आहे, माझा मुलगा आता परत येणार नाही त्यामुळे कोर्ट प्रकरण वाढवायचे नाही असे त्यांनी पोलिसांना तपासात सांगितले, या बाबी पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी केस डायरीत नमुद केल्या असुन त्या कोर्टात मांडण्यात आल्या आहेत. आरोपीला जामीन दिल्यास दबाव येईल, कांबळे यांचा या गुन्ह्यात सहभाग असलेबाबत साक्षीदार यांचे जबाब, पुरावे असल्याचे सरकारी वकील ऍड किरण कोळपे यांनी सांगितले. कांबळे यांना सुप्रीम कोर्टाने 4 आठवड्यात शरण जाण्याचे आदेश दिले होते मात्र त्यांनी त्याचा अवमान केला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणुन दिले.
ना मंत्री,ना खासदार ना आमदार, नाम तो सुना ही होगा.. साम,दाम,दंड भेद… सिंघम,सरकार राज असे फिल्मी डायलॉग वापरत कांबळे यांची अनेक गावात मिरवणूक काढुन जेसीबीतुन फुले, गुलाल उधळण्यात करण्यात आली, फटाके फोडत जल्लोष करण्यात आला, त्याचे व्हिडिओ, रिल्स, फोटो स्वतः कांबळे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले. तात्पुरता जामीन हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग असतो तो दोषमुक्ती नसतो मात्र युद्ध जिंकल्याच्या आवेशात सुरेश भाऊ कांबळे यांनी शक्तीप्रदर्शण केले व इव्हेंट बनवला. पठाण कुटुंबाच्या जखमेवर मीठ चोळले, समाजात या कृत्याचा निषेध झाला तर पोलिसांनी हे सगळे कोर्टात मांडले, परिणामी अडचणीत वाढ झाली.
भुम येथील 30 वर्षीय फय्याज दाऊद पठाण या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात बार्शी येथील डॉ नंदकुमार स्वामी,अर्चना स्वामी,यश स्वामी व सुरेश कांबळे यांच्या मानसिक जाच व मारहाणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सांगितल्याने कलम 306,323,504,506 व 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आत्महत्या केल्यावर माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. कांबळे सारखे गुंड जर म्हणत असतील पोलीस माझे काही करू शकत नाहीत तर मग तुम्ही पोलीस चौकीला मोठे कुलपे लावा. तुमची काही गरज नाही, माझा मृतदेह तेव्हाच कुटुंबाच्या ताब्यात द्या जेव्हा सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात जेलमध्ये असतील. माझ्या मृतदेहाला मुंग्या लागल्या तरी चालेल मात्र तो देऊ नका अशी कळकळीची विनंती विडिओमध्ये करीत फय्याज यांनी आत्महत्या केली होती.